मुंबई / ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली. कोणता प्रस्ताव? काय प्रस्ताव? आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत शिवसेना-भाजप महायुतीचाच महापौर होत आहे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोणता प्रस्ताव? काय प्रस्ताव? आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत शिवसेना-भाजप महायुतीचा महापौर होत आहे. भाजप व शिवसेना ही आताची युती नाही. ती बाळासाहेब, अटलजी व अडवाणींच्या काळातील युती आहे. ‘एनडीए’मध्ये आम्ही सोबत आहोत. महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही आहोत. ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढलो, तिथे महायुतीचेच महापौर होतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातही स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आमची युती आहे. त्यांच्यासारखी याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल, अशी युती नाही. खुर्ची व सत्ता हा आमचा अजेंडा नाही. विरोधकांनी लगेचच मुंबईला तोडण्यात येणार असल्याची ओरड केली; पण मराठी माणूस तुमच्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेला. मुंबईकरांना जीवनात काय मिळणार, हा आमचा अजेंडा आहे. आता मनसेही आमच्यासोबत येत आहे.
यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत होती. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना व भाजप महायुती म्हणून निवडणूक लढले आणि महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू. मनसेने विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला साथ दिली. आमच्यात महापौरपदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही. बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्ने पाहणे चुकीचे आहे, असे शिंदे म्हणाले.
शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत : संजय राऊत
महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर कोण होणार? यासंदर्भात केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळातच जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा घेण्यासंदर्भात विचारले असता, राऊत आधी म्हणाले, ‘पक्ष निर्णय घेईल. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत महापौरपद सोडणार नाही.’ यावर, आपण म्हणालात, पक्ष निर्णय घेईल? असे विचारले असता, ‘काय करायचं यापुढे? शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत.’ असे राऊत यांनी म्हटले आहे. सत्ता मिळाली नाही, म्हणून आमचा जीव तडफडत नाही.