

मुंबई : राज ठाकरेंसोबत आपण वादळात खेळून मोठे झालो आहोत. वडिलांशी असलेले नाते आणि आईने घर सावरण्यात दिलेले योगदान मोलाचे आहे. गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला शाप असून, भगव्याशी गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता, असे रोखठोक विचार उद्धव ठाकरे यांनी मांडले. शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने श्री षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर आले आहेत. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर उभय नेते पहिल्यांदाच एकत्र आले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली परिस्थिती तसेच शिवसेना पक्षात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत शिंदे गट तसेच भाजपवर टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. पुढच्या वर्षी 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. आपण अनेकांनी चढ-उतार पाहिले आहेत. राज आणि माझे बालपण एकत्र गेले आहे. आम्ही वादळात खेळत मोठे झालो आहोत. त्यामुळे आम्हाला वादळाशी कसे लढायचे, हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आज आपल्याशी बोलताना तो सगळा काळ डोळ्यांसामोरून जात आहे.
महाराष्ट्राचे राजकारण गुलामांचा बाजार : राज ठाकरे
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार झाला आहे. एकेकाळी गावच्या चावडीवर उभे करून लोकांचा लिलाव केला जात असे, तोच प्रकार राजकारणात सुरू आहे. बाळासाहेबांनी घडवलेली माणसे आज अनेक पक्षात दिसतात. मात्र, त्यांचे आजचे वर्तन पाहून बाळासाहेब ठाकरे कमालीचे व्यथित झाले असते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी बदलत्या राजकीय भूमिकांवर भाष्य केले.
‘आरोग्य आपल्या दारी’; शिवसेनेचे राज्यभरात उपक्रम
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेकडून ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता मोहीम, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यासह अनेक लोकोपयोगी उपक्रमांची घोषणा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
भाजप अध्यक्षांचे मराठीतून अभिवादन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोशल मीडियावर मराठीत पोस्ट करत अभिवादन केले. त्यांनी लिहिले, ‘वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. माननीय बाळासाहेब हे एक द्रष्टे नेते होते. त्यांचे निर्भीड नेतृत्व, जनतेप्रती निष्ठा आणि प्रखर राष्ट्रवादी विचार यांचा महाराष्ट्रावर गाढा प्रभाव आहे. त्यांचे विचार हे येणार्या पिढ्यांना प्रेरणा देतील.’