मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
17 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकात आपापल्या मतदारसंघात चांगली कामगिरी करू न शकलेल्या मंत्र्यांवर शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना क्रमांक दोनवर आली असली तरी काही मंत्र्यांनी निवडणूक हाताळताना हयगय केली असल्याचे शिंदे यांचे मत आहे.
पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने आवश्यक ती सर्व मदत केल्यानंतरही जे मंत्री त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात चमकदार कामगिरी करू शकले नाहीत त्यांना बदलायचे की काय? अशी चर्चाही शिवसेना शिंदे गटात सुरू झाली आहे. मंत्री मंडळात शिवसेनेतर्फे शपथविधीसाठी नावे पाठवली होती तेव्हा अडीच वर्षांनंतर ही मंडळी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच केले होते.
सध्याची नाराजी आणि भविष्यात होणारे बदल यांचा संबंध जोडून काही मंत्र्यांना नारळ मिळेल की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.याबद्दल अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी कामगिरी योग्य झाली नसल्याचे निरोप शिंदे यांनी चार ते पाच मंत्र्यांना स्वतः दिले आहेत असे विश्वासनीयरित्या समजते.
कोणकोणत्या जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने किती किती जागा जिंकल्या आहेत याचा सविस्तर आढावा पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने तयार केला आहे. मुंबई महापालिका आणि मराठवाड्यात कामगिरी अपेक्षा पूर्ण करू शकली नाही असा निष्कर्ष आहे. या आढाव्यानुसार प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या मूल्यमापनानुसार ज्या जिल्ह्यात तेथे असलेल्या मंत्र्याने योग्य कामगिरी केली का नाही, त्याच्यावर असलेली जबाबदारी का पार पडली गेली नाही याचे सविस्तर विलेषण एकनाथ शिंदे यांनी स्वतः केले असल्याचे समजले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींची शिंदे यांनी सविस्तर नोंद घेतली असल्याचे एका निकटवर्तीयाने सांगितले. नवी मुंबई परिसरात वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष तरी केलेली विधाने कमालीची दुखावणारी आहेत. भारतीय जनता पक्ष हा आपला मित्र असतानाही असे का बोलले गेले यावर शिंदे यांचे निकटचे सहकारी चिंतन करीत आहेत असेही समजते.
जिथे ताकद आहे तेथे भाजपचे काही नेते आपल्याला अडचणीत आणतील की काय याचाही सविस्तर विचार अंतर्गत वर्तुळात केला जातो आहे असे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत कलह तसेच काँग्रेसचे एकंदर वातावरण लक्षात घेता भविष्यात महाराष्ट्रात पाय रोवून उभे राहण्याचे शिंदे यांनी ठरवले आहे.
भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्या खालोखाल असलेले यश हे शिवसेना शिंदे गटाचे आहे त्या यशात जेथे विजयश्री खेचून आणता आली त्या मंत्री आमदारांवर अर्थातच पक्ष नेतृत्व खुश असून जेथे योग्य कामगिरी झाली नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे.
निवडणूक काळामध्ये जिल्हा किंवा महानगर पातळीवर जी मागणी केली गेली ती पुरवण्यात आली योग्य ते मार्गदर्शन केले तरीही अपयश आल्याने त्या त्या ठिकाणच्या नेत्यांचे मूल्यमापन आता कठोरपणे केले जाणार असल्याचेही समजते. अधिवेशनाच्या काळातच शिंदे मंत्र्यांचा वर्ग घेण्याची ही शक्यता आहे राज्यभरात निवडून आलेले नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य तसेच नगरपरिषद सदस्यांचा सत्कार समारंभ मुंबईत आयोजित केला जाईल. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाणार आहे या संदर्भातील रूपरेषा लवकरच अंतिम रूप घेईल असेही सांगण्यात येते आहे.
पुढील तीन वर्ष काही जिल्हा परिषदा वगळता कुठेही निवडणूक नसल्याने आता पक्ष संघटनेच्या विस्ताराकडे लक्ष देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिंदे त्यांच्या सहकार्यासह ठाकरेंपासून बाहेर पडल्यानंतर सतत निवडणुका होत्या. मतदारांना सामोरे जावे लागले. पक्ष विस्तारासाठी तसेच संघटना बांधणीसाठी वेळ मिळाला नाही. आता मात्र ही कमतरता भरून काढायचे नियोजन तयार झाले आहे. या नियोजनात गाव तेथे शाखा या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या धोरणाबरोबरच घर तेथे शिवसैनिक असे नवे सूत्रही राबवण्यात येणार आहे.