मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यात आपण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे स्वतः शिंदे यांनीच मंगळवारी स्पष्ट केले. तसेच महायुतीचे घटक पक्ष म्हणून एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात काहीही चुकीचे नसल्याचेही सांगितले.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केला. त्यांचा या दौऱ्याबाबत गुप्तता ठेवण्यात आल्याने महायुतीमध्ये नक्की काय चालले आहे, विधान परिषदेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
याविषयी मंगळवारी शिंदे यांनीच भाष्य केले. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा व अंतर्गत मतभेद या विरोधकांच्या मनातील कल्पना आहेत.
आम्ही एनडीएचे प्रमुख घटक आहोत आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना धूळ चारण्यासाठी पूर्ण ताकदीने एकत्र उतरणार आहोत. केंद्र आणि राज्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठीच हा दौरा होता, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.