राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर शिरसाट यांची शिंदेंकडून कानउघाडणी  pudhari photo
मुंबई

Mahayuti Politics : राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर शिरसाट यांची शिंदेंकडून कानउघाडणी

महायुतीतील पक्षांबाबत जपून बोलण्याचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना प्रवक्ते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांची कानउघाडणी करत त्यांना महायुतीतील पक्षांबाबत बोलताना जपून बोलण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रवादीतून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीचे काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेत. पक्षात कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादीत काय घडतेय, हे लवकरच कळेल; पण राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नाही, एवढे मात्र नक्की, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले होते. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे.

त्यावर आक्षेप घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. ते आमच्या पक्षाबाबत कसे काय बोलू शकतात? महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत याबद्दल मुश्रीफ यांनी नाराजीही व्यक्त केली.

यावरही शिरसाट बोललेच! मी काहीही वाईट बोललो नाही. राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात आहेत, असे मी म्हणालो; मग एकमेकांच्या संपर्कात नसावे का? संपर्कात असणे म्हणजे पक्ष फुटतोय, असा अर्थ का घेता? पक्षात आलबेल नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न शिरसाट यांनी केला. मुश्रीफांना काय तक्रार करायची तर करूद्या, मी माझी भूमिका मांडली आहे, असेही शिरसाट म्हणाले.

अशी वक्तव्ये करू नका : एकनाथ शिंदे

मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना फोन करून समज दिल्याचे समजते. महायुतीसंदर्भात करण्यात येत असलेली वक्तव्ये थांबवा. महायुतीत फूट पडेल, असे काही बोलू नका. आपल्याला तीनही मित्रपक्षांना घेऊन सरकार चालवायचे आहे. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये करू नका, अशा शब्दांत शिंदे यांनी शिरसाट यांची कानउघाडणी केल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT