मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने वरळी कोळीवाडा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की केल्याने वरळी कोळीवाडा परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण आणल्याने संभाव्य राडा टळला.
मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. त्याप्रमाणे दर्या राजाला सोन्याचा श्रीफळ अर्पण करण्यासाठी कोळीवाडा सजला होता. महिला व पुरुष कोळी बांधव पारंपरिक कोळी वेशात नटले होते, पारंपरिक कोळी वाद्यांचा आवाज घुमत होता. वरळी कोळीवाडा हा आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात येतो. ठाकरे गटाने या मतदारसंघावर पकड घेतल्यापासून आदित्य ठाकरे दरवर्षी कोळी बांधवांच्या नारळी पोर्णिमेच्या सणात सहभागी होण्यासाठी जातात. आज त्यांच्याच मतदारसंघात नारळी पोर्णिमेनिमित्त कोळी बांधवांच्या सणात सहभाग घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. शिंदे व आदित्य ठाकरे येणार म्हणून वरळी कोळीवाड्यात पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. आदित्य ठाकरे हे पोहोचण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावत कोळीबांधवांना शुभेच्छा दिल्या. समुद्राच्या पाया पडल्यानंतर शिंदे माघारी फिरत असताना त्याचवेळी आदित्य ठाकरे हेही तेथे पोहोचले. एका अरुंद गल्लीत हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी आदित्य ठाकरेंसोबत दादर-माहीमचे आमदार महेश सावंत आणि आमदार सुनील शिंदे व सचिन अहिर देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे परस्परांचे विरोधक आमनेसामने येताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदे हे जात असताना आदित्य हे रागाने त्यांच्याकडे पाहत असल्याचे दृष्य दिसले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वरळी कोळीवाड्यात तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान,परिस्थिती चिघळू नये यासाठी परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी दोन्ही नेत्यांभोवती संरक्षण कडे करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा प्रसंग उद्भवला नाही.
वरळीतील लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी दिलेल्या निमंत्राला मान देऊन आपण येथे आलो होतो. नारळी पोर्णिमेच्या सणात सगळेच सहभागी होतात. प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे. लोकांच्या सोबत काम केले पाहिजे, त्यांच्या सणात सहभाग घेतला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला येत असतो. मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला आनंद होतो आणि हाच आनंद मी घेऊन आलो होतो. अनेक लोक देशभरातून आणि महाराष्ट्रातून येथे येत असतात. पण काही लोकांना महत्त्व द्यायचे नसते तसे मी कोणाला महत्त्व देत नाही. पण या सणात काही गडबड होत आहे काय हे पाहत होतो.आ. आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख.