Egg Pudhari
मुंबई

Egg Price Increase: अंड्यांच्या दरानेही गाठली उसळी! वर्षभरात ४०% वाढ; किरकोळ भाव ९ रुपयांवर

इथेनॉल, हवामान, मका उत्पादन, कोंबड्यांची उत्पादकता यांचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अलिकडेच साखर, गूळ, तांदूळ, कांदा यांच्या दराने जोरदार उसळी मारली आहे. यात भर आता रोजच्या आहारातील अंड्यांचीही पडली आहे. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किंमतीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पोल्ट्रीफार्ममधून बाहेर पडणाऱ्या अंड्याचा दर ७ रुपयांवर पोहोचला असून अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात ८.५० ते ९ रुपयांना विकले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोंबड्यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मक्याच्या मागणीत झालेली वाढ हे आहे.

नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीच्या अहवालानुसार, अंड्यांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून पोल्ट्री फार्ममध्ये ७ रुपयांना विकल्या जाणाऱ्या अंड्यासाठी किरकोळ बाजारात ग्राहकांना ८.५० ते ९ रुपये मोजावे लागत आहेत. याचाच अर्थ अंड्याच्या किंमतीतील वाढ ही केवळ घावूक पातळीवर नसून याचा फटका थेट सामान्य ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.

अंड्याचे दर वाढण्यामागे मका हे महत्वाचे कारण आहे. मका हे कोंबड्यांच्या खाद्यातील महत्वाचा कच्चा माल आहे.

मक्याशिवाय सोयाबीन तसेच इतर घटकांचाही त्यात वापर होत असतो. त्यामुळे या खाद्याचा दर वाढला की पोल्ट्री फार्मचा उत्पादन खर्चही वाढतो. याचाच परिणाम अंड्यांच्या दरावर होत असतो. सध्या मक्याची मागणी इथेनॉल व पोल्ट्री या दोन्ही क्षेत्रातून वाढल्याने कोंबड्यांच्या खाद्याच्या किंमतीवर दबाव निर्माण झाला आहे.

देशाने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी धान्यांचा वापर वाढला असून त्यामध्ये मका हा महत्वाचा फिडस्टॉक बनला आहे.

यासंदर्भात माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०२५-२६ मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे १२५.७८ लाख टन मका वापरला जाण्याचा अंदाज आहे.

मका केवळ पोल्ट्री उद्योगासाठीच महत्वाचा नाही तर इथेनॉल, पशुखाद्य व इतर औद्योगिक वापरासाठीही त्याची मागणी आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रातून मक्याची मागणी वाढल्यास देशांतर्गत पुरवठ्यावर दबाव येवू शकतो.

परिणामी, मक्याचे दर वाढल्यास पोल्ट्रीफिड तयार करण्याचा खर्चही वाढतो. मात्र इथेनॉल हे अंड्याच्या दरवाढीचे एकमेव कारण नाही. हवामान, मका उत्पादन, कोंबड्यांची उत्पादकता व इतर फिड घटकही महत्वाचे आहेत.

मक्याची देशांतर्गत मागणी वाढण्याचा परिणाम आयातीवरही झाला आहे. २०२४ मध्ये देशाने सुमारे ८.९ लाख टन मका आयात केला होता. म्यानमार व युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात मका भारतात आला. यापूर्वी भारत हा मका निर्यातदार देश होता. मात्र सध्या फिड, इथेनॉल व इतर औद्योगिक वापरासाठी मक्याची मागणी वाढल्याने आजचे समीकरण बदलले आहे.

तरीही देशात मक्याचे उत्पादन वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२४-२५ मध्ये देशाचे मका उत्पादन सुमारे ४.३४ कोटी टन झाले आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारकडून मक्याचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT