EduCity Navi Mumbai Pudhari
मुंबई

EduCity Navi Mumbai: एज्युसिटी, मेडिसिटीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

प्रकल्पासाठी जागा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: एज्युसिटी व मेडिसिटीच्या क्षेत्रात नामांकित विद्यापिठांनी त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. कॅम्पस सुरू करण्यासाठी संबंधित विभाग आणि यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या एज्युसिटी आणि मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे एज्युसिटी आणि मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी एज्युसिटी आणि मेडिसिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी आणि मेडिसिटी आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची तसेच मेडीसीटीसाठी आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती सिडकोच्यावतीने बैठकीत देण्यात आली.

जगातील नामांकित आणि अग्रगण्य विद्यापीठे देशात तसेच महाराष्ट्रात आपले कॅम्पस सुरू करत आहेत. या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे. यामध्ये युएस, युके, ऑस्ट्रेलिया व इटली या देशांतील सहा आंतरराष्ट्रीय विद्यापिठांशी करार करण्यात आला आहे. या सर्व विद्यापिठांचे अभ्यासक्रम यावर्षी सुरु होणार असून या उपक्रमामुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT