आयटीआय प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस; दोनच दिवसात 4 हजारांवर अर्ज File Photo
मुंबई

Education News | अभियांत्रिकी प्रवेशासाठी तीन दिवसांत केवळ 22 हजार अर्ज

लाखो विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून दूर; 8 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एमएचटी सीईटी दिलेल्या 4 लाख 22 हजार 663 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या तीन दिवसांमध्ये राज्यभरातून केवळ 22 हजार विद्यार्थ्यांनीच अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे सेतू केंद्रावर वेळेत मिळत नसल्याने अर्ज नोंदणी करण्यास अडचणी येत असल्याचे पालकांनी सांगितले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) शनिवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, 8 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे.

सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा यंदा 19 ते 27 एप्रिल या कालावधीत विविध सत्रांमध्ये घेण्यात आली. त्यानंतर अखेरच्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर त्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी 5 मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली. एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसानयशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 22 हजार 663 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 16 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सीईटी कक्षातर्फे 27 जून रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार शनिवारपासून अर्ज नोंदणीला सुरूवात झाली असली तरी तीन दिवसांमध्ये अवघ्या 22 हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात विद्यार्थांनी नोदणी करणे शिल्लक आहे.

प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते, अर्ज करूनही सेतू केंद्रावर वेळेत मिळत नाहीत, अनेक पालकही अर्ज भरताना अडचणी आल्यानंतर दाखले काढतात यामुळेही याचा परिणाम नोंदणीवर दिसत आहे. यावर्षी तर एमएचटी सीईटी परीक्षेत 100 पर्सेंटाईल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी जेईईमध्ये चांगले गुण मिळवले असल्याने त्यांनी आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेशाला प्राधान्य दिले आहे.

दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 90 ते 99.99 पर्सेंटाईल गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 471 ने वाढली आहे. यंदा पीसीएम गटातून तब्बल 4,22,663 विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 70 ते 80 पर्सेंटाईल मिळवणार्‍यांची संख्या देखील 5,718 ने अधिक आहे. त्यामुळे उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र होणार आहे, असे असताना त्या तुलनेत नोंदणीची गती दिसत नाही.

17 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी

विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 12 जुलैला तात्पुरती यादी जाहीर होईल. या यादीवर हरकती आणि सूचना व तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना 13 ते 15 जुलैपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.

दीड लाख जागा वाढणार

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यंदा दीड लाखांहून अधिक जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 16 जून रोजी निकाल लागूनही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT