मुंबई: सुमारे १३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालय-२च्या पथकाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकून शोधमोहीम राबवली. ही कारवाई गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे.
या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या पुणे येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या एफआयआर आणि त्यानंतर दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने सुरू केला आहे.
बँक समूहाची १३५ कोटींची फसवणूक
ईडीच्या तपासानुसार, गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपीच्या भागीदारांनी, त्यामध्ये नितीन रामचंद्र जाधव यांच्यासह इतरांचा समावेश असून, बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची सुमारे १३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कर्जाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा त्यानंतर कथितरित्या अनधिकृत पद्धतीने वळवून अपहार करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे या निधीचा नेमका वापर कुठे करण्यात आला, तो कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांकडे वळविण्यात आला आणि त्यातून निर्माण झालेल्या कथित गुन्ह्यातील पैशांचा माग कुठे जातो, याचा तपास ईडीकडून केला जात आहे.
निधी वळविल्याचा आरोप
या प्रकरणातील कथित बँक फसवणुकीतून मिळालेल्या निधीचा विविध माध्यमांतून वळवणूक आणि अपहार करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. या कारवाईत तपासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे शोधण्यात आले असून, बँक फसवणुकीतील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि निधीचा माग तपासला जात आहे.