

मुंबई: मुंब्रा येथील नमीरा तारिक खान (१९) ही तरुणी नव्या पासपोर्टसाठी अर्ज करताना जुन्या पासपोर्टची माहिती लपवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) रडारवर आली आहे. एटीएसच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिचा जुना व नवा पासपोर्ट, परदेश प्रवास आणि अर्जातील माहितीची सखोल पडताळणी सुरू आहे.
नमीरा हिने यापूर्वी पासपोर्ट काढला होता. त्यानंतर नव्या पासपोर्टसाठी अर्ज करताना आधीच्या पासपोर्टची माहिती दिली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना पूर्वीच्या पासपोर्टची माहिती देणे आवश्यक असल्याने, ही माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली होती का, याचा तपास केला जात आहे.
एटीएसकडून नमीरा हिच्या परदेश प्रवासाची माहितीही तपासली जात आहे. तिने काही आखाती देशांना भेट दिल्याचे समोर आले असून, या प्रवासाचा कालावधी, त्या वेळी तिच्यासोबत कोण होते आणि परदेशात तिच्या संपर्कात कोण आले होते, याची माहिती तपास यंत्रणा घेत आहेत. तिच्या जुन्या आणि नव्या पासपोर्टमधील नोंदींचीही तुलना केली जात आहे.
नमीरा हिचे वडील तारिक खान यांच्यावर प्रतिबंधित 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)'शी कथित संबंध असल्याप्रकरणी पूर्वी गुन्हा दाखल झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
तसेच त्यांचे इंडियन मुजाहिद्दीनमधील काही तरुणांशी कथित संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. तारिक खान हे फरार असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली होती का, याचा तपास केला जात आहे.