Ebola File Photo
मुंबई

Ebola High Alert: देशात इबोलाचा धोक्याचा इशारा; विमानतळांवर 21 दिवसांची कडक नजर

केंद्राच्या निर्देशानुसार बाधित देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांचा 21 दिवसांपर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा केला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: काँगो लोकशाही प्रजासत्ताक (डीआरसी) आणि युगांडा येथे इबोला विषाणूच्या ‌‘बुंडीबुग्यो‌’ प्रकाराचा उद्रेक झाल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी केला आहे. संभाव्य संसर्गाचा धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरे आणि राज्यांच्या आरोग्य विभागांसाठी सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) लागू केली आहे.

केंद्राच्या निर्देशानुसार बाधित देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांचा 21 दिवसांपर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा केला जाणार आहे. विमानप्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशामध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या, अतिसार किंवा रक्तस्राव यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याला तातडीने इतर प्रवाशांपासून वेगळे करण्यात येईल.

एसओपीनुसार बाधित देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना स्वयं-घोषणापत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये गेल्या 21 दिवसांचा प्रवास इतिहास आणि आरोग्यविषयक माहिती नमूद करावी लागणार आहे. विमानतळांवर प्रवाशांचे जोखीम पातळीनुसार वर्गीकरण करण्यात येणार असून, लक्षणे नसलेल्या पण संसर्गितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही विशेष क्वारंटाईन केंद्रात ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

इबोलाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना विमानतळावरून थेट विशेष रुग्णवाहिकेद्वारे आयसोलेशन केंद्रात हलवण्यात येणार आहे. दरम्यान, डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, एन-95 मास्क, फेस शिल्ड आणि दुहेरी हातमोजे वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इबोलाविरुद्ध केंद्राच्या पाच सूचना

  • विमानतळ व बंदरांवर विशेष तपासणी

  • बाधित देशांतून येणाऱ्यांवर 21 दिवस देखरेख

  • संशयितांना तत्काळ क्वारंटाईन व आयसोलेशन

  • पुण्यात नमुन्यांची विशेष तपासणी

  • जिल्हानिहाय रॅपिड रिस्पॉन्स टीम सज्ज ठेवण्याचे आदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT