ई-चलन फाडणार्‍या वाहतूक पोलिसांना आता देणार बॉडी कॅमेरे 
मुंबई

Traffic Police : ई-चलन फाडणार्‍या वाहतूक पोलिसांना आता देणार बॉडी कॅमेरे

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मुंबईसह राज्यभरात वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना आता चांगलाच दणका बसणार आहे. गोव्यातील पोलिसांप्रमाणे ई-चलनाचा अधिकार असणार्‍या महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. यामुळे वाहतुकीला शिस्त येईल, ई-चलनावरून उद्भवणारे वाद घटतील आणि न्यायालयीन प्रकरणांतही याचा उपयोग होईल, असे सांगताना टप्प्याटप्प्याने हे बॉडी कॅमेरे आणण्याचा शासनाचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणार्‍या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे कारवाई केली जाते. तथापि, वाहतूक पोलिसांना हे अधिकार असताना स्थानिक पोलिसही खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून वाहनांवर कारवाई करतात. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सतेज पाटील, प्रसाद लाड, भाई जगताप, अनिल परब, मनीषा कायंदे यांनी भाग घेऊन विविध मुद्दे मांडले. जुन्या चाळी, झोपडपट्टीमधील वाहनधारकांकडे पार्किंगची व्यवस्था नसते. यामुळे ते रस्त्याकडेला गाड्या उभ्या करतात. त्यावर स्थानिक पोलिसांकडून होणार्‍या कारवाईमुळे वाद होतात. त्यामुळे ई-चलनाचे अधिकार नेमके कोणाला दिले आहेत, स्थानिक पोलिसांना हे अधिकार नसतील तर त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, अशी विचारणा शिंदे यांनी केली.

त्याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मुंबई आणि मुंबई महानगर प्राधिकरणासह राज्यातील काही भागांतून यासंंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने बैठक झाली. यामध्ये खासगी फोनद्वारे कोणी फोटो काढत असेल, तर ते चुकीचे आहे. तसे होऊ नये, यासाठी सूचना केल्या आहेत. वाहनांवर कारवाईचा अधिकार स्थानिक पोलिसांना नाही. त्याबाबत सर्व पोलिस ठाण्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यानंतर चंद्रपूर येथे एक कारवाईदेखील केली आहे.

ई-चलनाच्या वसुलीसाठी अभय योजना

वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांना ई-चलन पाठवूनही ती रक्कम भरली जात नाही. अ‍ॅटोमेटिक चलन निर्माण होत असल्याने तेवढी वसुली करण्याची आपल्याकडे व्यवस्था नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोकअदालत घेतली जाईल. शिवाय, मोठ्या प्रमाणात ई-चलनाची थकबाकी असणार्‍यांसाठी अभय योजना आणण्याचा विचार आहे. यामध्ये 50 टक्के रक्कम भरून संबंधित वाहनांची उर्वरित रक्कम माफ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT