मुंबई

मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चामुळे विविध ठिकाणी वाहतूक मार्गात बदल

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीच्या महामोर्चामुळे मुंबईत विविध ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातून दक्षिण मुंबईत येणा-या मार्गात बदल करण्यात आला होता. त्यामुळे पी.डीमेलो रोडवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी वाहतुक मार्गात केलेले बदल पूर्ववत केले; परंतु वाहतूक सुरळीत होण्यास संध्याकाळ झाली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज ( दि. १७ ) महामार्चा काढला. हा मोर्चा शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भायखळा येथील रिचर्डसन्स क्रुडास मिल येथून सुरु होउन जे.जे उड्डाणपुलावरुन टाईम्स ऑफ इंडिया'च्या इमारतीसमोर ( सीएसएमटी रेल्वे स्टेशन) समाप्त झाला.

मोर्चाकरीता वाहतूक पोलिसांनी रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे सीएसएमटी स्थानकाबाहेरील जे बेस्टचे बस थांबे आहेत. त्यावरील वाहतूक बंद होती. यामुळे 'सीएसएमटी'ला उतरुन गेट वे ऑफ इंडिया, चर्चगेट, कुलाबा,नेव्ही नगरला जाणार्या प्रवाशांना हुतात्मा चौकातून बस पकडावी लागली.

मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडवरुनच वाहतूक सुरु असल्याने पी.डीमेलो रोडवरील वाहतूक सण्डहस्ट रोड स्थानकापासून रखडली होती. मुंबईकडे येणारी सर्वच वाहने या मार्गावरुन येत असल्याने या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. जीपीओ ते महापालिका या बस प्रवासासाठी २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. याशिवाय छेडा नगर ते अमर महल जंक्शन दरम्यान वाहतुकीचा वेग मंदावला होता.

बसच्या मार्गात बदल

एच.अन्सारी चौक , भायखळा ब्रिज, येथून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे बस क्रमांक १,५१,१५,५,८,१९,ए २५,ए १९ आणि ४ बसमार्ग सरदार हाटल ते काळा चौकी मार्गे पी.डी मेलो रोडमार्गे वळविण्यात आले होते. दादाभाई नौरोजी रोडवर वाहतूक कोंडी झाल्यामुळे सकाळी ११.५५ वाजल्यापासून अप दिशेने मुंबईहून जाणारे बस मार्ग जी पी ओ, पी .डी मेलो मार्ग ,रे रोड भायखळामार्गे चालविण्यात आले.

दादाभाई नवरोजी मार्ग अप आणि डाऊन दिशेने सीएसटी ते नागपाडा दरम्यान बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक १,३,४५,,१०७,१०९,११३,६,८,११,१९,२१,२५,४५,१०३ या मुंबईत येणार्या बस देखील पी ,डी मेलो मार्ग मार्गे चालविण्यात आल्या. बस मार्ग क्र १२४,१२५,२, ५१ वासुदेव बळवंत फडके चौक, जगन्नाथ शंकर शेठ मार्गे गिरगाव चर्च राजा राम मोहन मार्ग भायखळा असे सकाळी पावणे बारा वाजल्यापासून चालविण्यात आले.

वासुदेव बळवंत फडके चौक ते पायदुनी दरम्यानचा काळबादेवी रोड बंद केल्याने बस मार्ग क्रमांक ५,९,१४,१५,१२४,१३४ वाहतुक जगन्नाथ शंकर शेठ मार्ग गिरगाव चर्च प्रार्थना समाज सेंट्रल दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून सुरु केली. वाहतुक पोलिसांनी लालबागपासून ( डॉ .बी. ए. रोड) रस्ता दुपारी एक वाजता वाहतूकीसाठी खुला केला.

टॅक्सीची संख्या कमी

शनिवारी-रविवारी दक्षिण मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. परंतु शनिवारी मोर्चामुळे दक्षिण मुंबईत टॅक्सीची संख्या नेहमीच्या तुलनेच कमी दिसून आली. त्यामुळे टॅक्सी मिळविण्यासाठी प्रवाशांना बराच खटाटोप करावा लागत होता. त्यातच बसच्या मार्गात बदल केल्याने नागरिकांना,पर्यटकांना बसकरिता बराच वेळ वाट पहावी लागत होती. यामुळे बसला देखील प्रचंड गर्दी झाली होती.

हेही वाचा  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT