नवी मुंबई : हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढत्या मार्गावर असून, त्यातही आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्य़ा शेवग्याचा दर तब्बल 400 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. एपीएमसी घाऊक बाजारातदेखील शेवगा 200 ते 240 रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ बाजारात त्याचा दर 350 ते 400 रुपये किलोवर स्थिर आहे.
मागील काही दिवसांपासून बाजारात शेवग्याची आवक अत्यल्प झाल्याने सोमवारी एकही ट्रक किंवा गाडी बाजारात आली नाही. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी शेवग्याला मोठी मागणी असते. त्यामुळे कमी आवक आणि जास्त मागणी या दुहेरी परिणामामुळे शेवग्याचा दर आकाशाला भिडल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याच शेवग्याचा दर अवघ्या दहा दिवसांपूर्वी 60 ते 110 रुपये किलो होता. परंतु दहा दिवसांतच दराने उसळी घेत 150 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे.
शेवग्याबरोबरच इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. भेंडी, चवळी, गवार, घेवडा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो यांच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ झाली असून किरकोळ बाजारात टोमॅटो 50 रुपये किलोवर विक्रीस आहे. दुधी भोपळा, कोबी आणि फरसबी यांच्याही दरात हलकी वाढ झाली आहे.
कोथिंबीर आणि वाटाणा स्वस्त
दरवाढीच्या मालिकेत कोथिंबीर आणि वाटाणा मात्र स्वस्त झाले आहेत. कोथिंबीर 12 ते 14 रुपयांच्या तुलनेत आता 5 ते 6 रुपये जुडी उपलब्ध होत असून वाटाण्याचा दर 10 ते 20 रुपयांनी कमी झाला आहे.