मुंबई: मुंबईला नशामुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपास अनधिकृतपणे सुरू असलेल्या पानटपऱ्यांवर मुंबई पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई केली. जुलै महिन्यात शहरातील विविध भागांमध्ये तब्बल १ हजार ४९७ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) राज तिलक रोशन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत पानटपऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ तसेच अमली पदार्थांची विक्री होऊ नये आणि विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवता यावे, यासाठी पोलिस आणि महापालिकेच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केली जात आहे.
“तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखणे आणि मुंबईला नशामुक्त करण्यासाठी सामूहिक सहभाग वाढविणे, हा ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाईसोबतच जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे,” असे राज तिलक रोशन यांनी सांगितले.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण राबविण्यात येत असून, ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू आहे.
अनधिकृत पानटपऱ्यांवरील निष्कासनाची ही कारवाई अभियानाचा महत्त्वाचा भाग असून, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अशा कारवायांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी नियमित कार्यक्रमही आयोजित केले जात आहे.