खानिवडे (मुंबई) : पोलीस ठाणे परिसरात परिसरात ड्रग्ज कारखाना सापडल्याच्या प्रकरणामुळे वसई, विरारला हादरा बसला आहे. महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करणारा कारखाना सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना अनेक महिन्यांपासून सुरू असतानाही पेल्हार पोलिसांना त्याचा सुगावाही लागला नाही, हे अधिक चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना कर्तव्यात कसूर केली म्हणून निलंबित केले आहे.
मुंबई पोलिसांनी नुकतेच या परिसरात मोठे धाडसत्र राबवून हा ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला. मुंबई पोलिसांच्या या कारवाईनंतर वसई, विरार पोलीस यंत्रणा आणि स्थानिक रहिवासी अवाक झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसणे ही मोठी प्रशासकीय बेपर्वाई मानली जात आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावर कर्तव्यावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या या निलंबनानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.
स्थानिक नागरिक आणि समाजसेवी संस्थांकडून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, हा एकच कारखाना होता का? की वसई विरारमध्ये असे अनेक कारखाने पावसाळ्यातील मशरूमप्रमाणे उगवले आहेत? वसई-विरार परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे जाळे वाढले असून, अशा ठिकाणी गुन्हेगारी कारवाया फोफावत असल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी सर्व अनधिकृत बांधकामांची तपासणी सुरू केली आहे. कुठे गुन्हेगारी स्वरूपाची कामे, ड्रग्स तयार करणाऱ्या यंत्रणा किंवा अवैध व्यवहार चालतात का, याचा मागोवा घेतला जात आहे. या प्रकरणामुळे वसई-विरार परिसर आता ड्रग्सचा नवाकोपरा ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. एका छोट्या दुर्लक्षामुळे संपूर्ण समाजाच्या भवितव्यावर घाला येऊ शकतो, याची जाणीव या प्रकरणातून झाली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले की, ज्यांनी कर्तव्यात कसूर केली, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. गुन्हेगारी कृत्यांना वसई-विरारमध्ये जागा नाही. त्यांच्या या विधानानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी छापेमारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेल्हार परिसरात सापडलेल्या या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करून पुरवठा केला जात होता. स्थानिक तरुणांना लक्ष्य करून हे जाळे वाढत होते. मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ, तयार ड्रग्ज, यंत्रसामग्री आणि वाहनं जप्त केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाने वसई-विरार परिसरात खळबळ उडाली आहे.