मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.
राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, दीड कोटी पात्र शेतकर्यांसाठी ७,५०० कोटींची रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. यातून शेतकर्यांच्या बँक खात्यात पाच हजारांची अग्रीम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मात्र, शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टेक) नसणे तसेच ई-केवायसीही केली नसल्याने अद्याप ५० लाख शेतकर्यांच्या खात्यात अग्रीम जमा होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन विभागाने शेतकर्यांना विशेषतः दुष्काळी भागातील शेतकर्यांना तातडीने ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.
शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान व अन्य लाभ देण्यात येतात. यापूर्वीही शासनाने विविध संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी व फार्मर आयडीचे महत्त्व अधिक वाढले आहे.
पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित व अद्ययावत करण्यात येत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरत आहे.
योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी ई-केवायसी व फार्मर आयडी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्यासाठी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्र) येथे आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.