Dr. Milind Chitale Missing Pudhari
मुंबई

Dr.Milind Chitale Missing: हिमालयात शोधावा लागतोय डाॅक्टर चितळेंचा पत्ता

हिल्स अँड ट्रेल्सचे सहसंस्थापक डॉ. मिलिंद चितळे, पत्नी जान्हवी आणि त्यांच्या गटातील 60 कैलास-मानसरोवर यात्रेकरू नेपाळ-तिबेटमधील आपत्तीनंतर बेपत्ता असून संपर्कासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: डॉ. मिलिंद पी. चितळे यांच्यासाठी वैद्यक हा व्यवसाय होता, पण गिर्यारोहण ही त्यांची खरी ओढ होती. एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टर म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर, पर्वतांबद्दल आणि गिर्यारोहणाबद्दल प्रेम वाढले.

अखेर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडला आणि स्वतःला गिर्यारोहणाला वाहून घेतले, या आवडीतूनच त्यांनी हिल्स अँड ट्रेल्स ही कंपनी उभारली. गेली तीन दशके विविध साहसी गिर्यारोहण मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. ज्या हिमालयाने त्यांना वेड लावले त्याच हिमालयाच्या कुशीत आज त्यांचा ठावठिकाणा शोधावा लागतो आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी एका गिर्यारोहण मोहिमेदरम्यान डॉ. चितळे यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जवळपास तीन महिने ते घरीच होत. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतरही हिमालयाची ओढ कमी झाली नाही.

पत्नी जान्हवी यांच्यासोबत त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेची तयारी केली आणि अखेर २३ ऑगस्टला ते नेपाळला रवाना झाले. डाॅ. चितळे यांच्या गटाने २३ ऑगस्ट रोजी प्रवास सुरू केला. ६ सप्टेंबर रोजी परत येण्याचे नियोजित होते. हिल्स अँड ट्रेल्स कंपनीची ही यात्रा यावेळी नेपाळस्थित रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या समन्वयाने सुरू होती.

नेपाळ-तिबेटच्या महाप्रलयात बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये डॉ. मिलिंद चितळे यांच्यासह त्यांच्या पत्नी जान्हवी आणि त्यांच्या हिल्स अँड ट्रेल्सच्या माध्यमातून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या सर्व ६० यात्रेकरूंचा समावेश आहे.

या गटात कोल्हापूरचे सुशील कुलकर्णी आणि गीता कुलकर्णी हे दोघे सोडले तर बहुतांश मुंबईतीलच आहेत. अंधेरीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे आणि हिंदुजा हॉस्पिटलच्या हेमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख असलेले त्यांचे पती डॉ. आनंद देशपांडे. ६८ वर्षीय सुनील एस. सुभेदार आणि ६४ वर्षीय चेतना गुप्ता यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकही या गटात होते. त्यांचाही पत्ता नाही.

डॉ. आनंद देशपांडे यांची भाची मैथिली मुंडले हिने सांगितले की या जोडप्याशी शेवटचा संवाद रविवारी झाला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न केले. “त्यांच्या एका नातेवाईकाने काल सकाळी त्यांना मेसेज पाठवला, पण त्यावर एकच टिक दिसली. तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलेलो नाही.

बेपत्ता यात्रेकरूंमध्ये मूळचे नागपूरचे असलेले ६८ वर्षीय सुनील एस. सुभेदार हे आहेत. त्यांचा मुलगा स्वानंद सुभेदार याने सांगितले की त्याने वडिलांशी शेवटचा संवाद २६ ऑगस्ट रोजी झाला. तेेव्हा ते तिमुरे येथे होते आणि चीनकडे जाण्याच्या तयारीत होते. तेव्हापासून त्यांच्या वडिलांचा फोन बंद आहे.

६० च्या दशकात चितळे यांनी १९८३ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. पण साहसी खेळांच्या आकर्षणाने त्यांना पारंपरिक वैद्यकीय व्यवसायापासून दूर खेचले. १९९७ मध्ये त्यांनी हिल्स अँड ट्रेल्सची सह-स्थापना केली. शेकडो लोकांना हिमालय, लडाख आणि सह्याद्रीतील ट्रेक, मोहिमा आणि तीर्थयात्रा घडवल्या.

डॉ. चितळे यांचा स्वतःचा गिर्यारोहणाचा प्रवास मोठा आहे. त्यांनी ३,००० हून अधिक हिमालयीन मोहिमा पार केल्या. कांचनगंगा पर्वतावर २३,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर चढाई केली. १९९७ च्या एव्हरेस्ट मोहिमेच्या आयोजन समितीतही ते होते.

८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या पर्वतावरील पहिल्या भारतीय नागरी मोहिमेत त्यांनी क्लायंबिंग डॉक्टर म्हणून काम केले. त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आणि पर्वतीय प्रथमोपचार आणि बचाव यावर एक पुस्तक लिहिले. गिर्यारोहणातील योगदानाबद्दल त्यांना २००५ मध्ये गिरिमित्र पुरस्कार मिळाला.

कैलास-मानसरोवर यात्रा तर डॉ. चितळे यांच्यासाठी विशेष परिचयाचे क्षेत्र होते. त्यांनी ही यात्रा २५ हून अधिक वेळा केली. एरव्‍ही असे दौरे ते एकटेच करत.यावेळी, एरव्‍ही मुंबईतील कार्यालयातून संपर्काचे काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी जान्हवी देखील सोबत गेल्या, असे हिल्स अँड ट्रेल्सचे टूर सल्लागार रुतेश पंडितराव यांनी सांगितले.

जुन्या पत्त्यावर पुनर्विकास

डॉ. चितळे यांच्या ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या साहसी पर्यटन संस्थेच्या संकेतस्थळावर अंधेरी पूर्वेतील स्वामी नित्यानंद मार्गावरील चंद्रशेखर सोसायटीचा पत्ता नमूद आहे. मात्र, ही इमारत सुमारे तीन वर्षांपूर्वी पुनर्विकासासाठी जमीनदोस्त करण्यात आली असून, सध्या तेथे नव्या इमारतीचे काम सुरू आहे.

त्यामुळे त्यांच्या जुन्या पत्त्यावरून डॉ. चितळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना अडचणी येत आहेत. सोसायटीच्या शेजारील इमारतीत असलेल्या कार्यालयात चौकशी केली असता, डॉ. चितळे गेल्या शुक्रवारी करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली. त्यांची मुलगी अमेरिकेत असते तर अंधेरी तेली गल्ली परिसरात त्यांचा दवाखाना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT