मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयाने अखेर यंदाच्या बारावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका (औषधनिर्माणशास्त्र) डी.फार्म अभ्यासक्रम प्रवेशाला सुरुवात केली आहे. आजपासून 4 ऑक्टोबरपर्यंत पसंतीक्रम भरता येणार आहेत. यंदा हे प्रवेश चार फेर्यांमधून केले जाणार आहेत. यानंतर संस्थास्तरीय प्रवेशाची प्रक्रिया होणार आहे.
राज्यातील फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा नोंदणीचा टप्पा पूर्ण झाला असला तरी प्रत्यक्ष अजून प्रवेश सुरु झालेले नव्हते. आता तंत्र शिक्षण संचालनायाने पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात केली आहे. 34 हजार 934 विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आता 1 ते 4 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. 7 ऑक्टोबरला पहिली यादीतून जागा वाटप जाहीर केले जाईल. 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान जागा स्वीकृती व प्रवेश निश्चिती करावी लागणार आहे.
दुसरी फेरी 11 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. तिसरी फेरी 18 ते 30 ऑक्टोबरदरम्यान होणार असून, चौथी व अंतिम फेरी 31 ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. यापुढे संस्था-स्तरीय प्रवेश 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान घेता येईल. तर उशिरा रद्द झालेल्या प्रवेशानंतरचे समायोजन 16 व 17 नोव्हेंबरदरम्यान केले जाणार आहे. शुल्क परताव्यासह प्रवेश रद्द करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 17 नोव्हेंबर हा प्रवेशाचा शेवटचा दिवस असणार आहे.