डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये रविवारी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पहाटे उसळलेल्या आगडोंबामध्ये आवारात पार्क केलेल्या 29 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या घटनेची पुनरावृत्ती शुक्रवारी पहाटे 3.18 वाजण्याच्या सुमारास घडली. याच सांगाव परिसरात असलेल्या गोकुळधाम सोसायटीच्या आवारात पार्क केलेली कार दोघा बदमाशांनी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली. हा सारा प्रकार सोसायटीच्या शेजारी असलेल्या एका बंगल्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे.
या संदर्भात गोकुळधाम सोसायटीत राहणारा रोहित रमेश सरोज (27) या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघा अज्ञात इसमांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 2023 चे काम 326 (एफ), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीतील एका कंपनीत मॅनेजर पदावर नोकरी करणाऱ्या रोहित सरोज याच्या मालकीची एम एच 05/एफ व्ही/1998 क्रमांकाची कार आहे. दैनंदिन वापराकरिता असलेली मारूती सुझुकी एर्टिगा कार कामावरून परतल्यानंतर रोहित याने गुरूवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात पार्क केली होती. शुक्रवारी पहाटे 3.18 वाजण्याच्या सुमारास त्याच इमारतीत राहणारे नितीन कपूर यांनी रोहितला फोन करून कारला आग लागल्याची माहिती दिली. कुणीतरी 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
कारचा मालक रोहित सरोज याने सोसायटीच्या शेजारी राहणारे बंगला मालक धीरज म्हात्रे यांच्या बंगल्याला लावलेले सीसीटीव्ही फूटेज तपासले असता सारा प्रकार समोर आला. पहाटेच्या सुमारास स्कूटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कारवर पेट्रोल टाकून तिला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. सदर कारची किंमत सुमारे 12 लाख रूपये असून ती अवघी एक वर्ष जुनी असल्याची माहिती रोहित याने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे सदर कार सीएनजी इंधनाची असल्याने आग अधिक भडकून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.