मुंबई: दरवर्षी लक्ष्मीपूजनानिमित्त आयोजित केले जाणारे शेअर बाजारातील मुहूर्त सत्र रविवारी (दि. ८) दुपारी २ वाजून २० मिनिटे ते साडेतीन या वेळेत चालेल. रविवारी शेअर बाजाराला सुटी असली, तरी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मुहूर्त ट्रेडिंगसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.
एमसीएक्स दुपारी २ वाजून ५ मिनिटे ते २ वाजून १९ मिनिटांपर्यंत विशेष सत्र आयोजित करेल, तर दुपारी २ वाजून २० मिनिटे ते साडेतीनपर्यंत मुख्य व्यापार सत्र सुरू राहील. सर्व वस्तू आणि निर्देशांकाचे करार व्यापारासाठी उपलब्ध असतील.
बीएसईने आयपीओ आणि पुनर्सूचित शेअरसह विशेष प्री-ओपन सत्रासाठी पात्र असलेल्या सिक्युरिटीजसाठी स्वतंत्र वेळा जाहीर केल्या आहेत. ऑर्डर एंट्री दुपारी दोन वाजून पाच मिनिटे ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत सुरू राहील. दुपारी दोन वाजून ५० मिनिटे ते तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत ऑर्डर मॅचिंग होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजून पाच मिनिटे ते साडेतीन या वेळेत ट्रेडिंग सुरू राहील.
काय आहे मुहूर्ताचा इतिहास
मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) १९५७ मध्ये मुहूर्त ट्रेडिंग सुरू केले, तर एनएसईने १९९२ पासून ही परंपरा पुढे सुरू ठेवली. लक्ष्मीपूजनापासून व्यापारी वर्षाची सुरुवात होते. या दिवशी व्यावसायिक चोपडापूजन अथवा हिशेबपुस्तकांची पूजा करतात.
मुहूर्ताला १९९६ पासून २५ वेळा वाढ
शेअर बाजारातील मुहूर्ताच्या विशेष सत्रात १९९६ पासून २५ वेळा वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यावेळी सेन्सेक्स ३ हजार ८० अंकांवर होता, तर आज ८१,०२८ अंकांवर आहे. आशियाई मंदीच्या काळात १९९७ रोजी सेन्सेक्सने मुहूर्त सत्रात ३.३३ टक्क्यांनी बुडी घेतली होती. त्याउलट २००८ मध्ये अमेरिकेत लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर सेन्सेक्स ५.८६ टक्क्यांनी वधारला होता.