नवी मुंबई : रांगोळी, आकाशकंदील, पणत्या आणि फराळाप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे मातीचा किल्ला! दिवाळीची सुट्टी सुरू झाली की दगड-माती गोळा करून मित्रमंडळींसोबत किल्ला उभारण्याची लगबग पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात पाहायला मिळायची.
मात्र, बदलत्या काळात मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या आकर्षणामुळे ही परंपरा काहीशी मागे पडताना दिसत आहे. तरीही दिवाळे कोळीवाड्यातील चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून बालपणीच्या या संस्कृतीला पुन्हा उजाळा दिला आहे.
दिवाळे कोळीवाड्यातील देव कोळी, गौरी कोळी, संस्कार कोळी, पार्थ कोळी आणि निधी कोळी या बच्चे कंपनीने एकत्र येत ऐतिहासिक किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. दगड, लाल माती, मावळे, सैनिक, तोफा, प्राणी, झाडे आणि विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून त्यांनी किल्ल्याची उभारणी केली आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक मांडणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत असून चिमुकल्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.
किल्ला उभारणीतून इतिहासाची ओळख
मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमणाऱ्या पिढीने हाती माती घेऊन किल्ला उभारणे, ही खऱ्या अर्थाने संस्कृतीच्या जतनाची सुरुवात आहे. किल्ला बांधणे म्हणजे दगड-मातीची रचना नव्हे, तर इतिहासाची ओळख, कल्पकतेला वाव आणि शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा देणारा संस्कार आहे. चिमुकल्यांनी जपलेली ही परंपरा पाहता आधुनिकतेच्या प्रवाहातही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची मुळे अजूनही घट्ट असल्याचे चंदन कोळी यांनी यावेळी सांगितले.
स्वरुप बदलले, उत्साह मात्र कायम
एकेकाळी गावागावांत दिवाळीच्या सुट्टीत मुले दगड, माती, शेण आणि इतर साहित्य गोळा करून किल्ले बांधायची. कुणी तटबंदी उभारायचे, कुणी मावळे सजवायचे, तर कुणी भगवा ध्वज आणि दिव्यांची रोषणाई करायचे. या उपक्रमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांची रचना, स्वराज्याचा पराक्रम आणि सांघिक कार्याचे महत्त्व शिकायला मिळायचे. आज शहरांमध्ये जागेची कमतरता आणि बदलती जीवनशैली यामुळे या परंपरेचे स्वरूप बदलत असले, तरी नव्या पिढीतील मुलांचा हा उत्साह कायम आहे.