ST Employee Bonus Pudhari
मुंबई

ST Employee Bonus | एसटी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये दिवाळी भेट; प्रताप सरनाईक यांची घोषणा

पात्र कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये सण उचल

पुढारी वृत्तसेवा

Pratap Sarnaik Announcement MSRTC Diwali Bonus

मुंबई : एसटीच्या ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी जाहीर केला.

एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत.
- प्रताप सरनाईक, अध्यक्ष एसटी महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT