मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pudhari photo
मुंबई

Maharashtra finance ministry : मुख्यमंत्रीच सांभाळणार राज्याच्या तिजोरीच्या चाव्या

राष्ट्रवादीला अर्थखाते देण्याचा कोणताही विचार नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते सांभाळणारा कोणताही नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याची जाणीव असल्याने यासंदर्भात कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. दिलीप वळसे-पाटील वगळता अर्थ खात्याचा आवाका असलेला नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थव्यवहार आणि या खात्यातील घडामोडी, दैनंदिन व्यवहार झेपण्याची शक्यता नसल्याने सध्या हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सांभाळावे लागेल. याची राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतेक सर्वांना कल्पना आहे.

उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्यात सुनेत्रा पवार उत्तमप्रकारे मेहनत घेत आहेत. त्यांच्याकडे असलेले अबकारी कर (एक्ससाईज) हे खातेही मोठे असल्याने त्यांनी लगेचच अर्थखाते मिळावे अशाप्रकारची कोणतीही मागणी उघड किंवा आडून केली नसल्याचे माहितीगार सूत्रांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत सरकारचा कारभार सहकार्याकडून समजून घेणे आणि पक्षकार्यात लक्ष घालण्यावर सुनेत्रा पवार लक्ष देतील, असे निकटच्या मंडळींनी सांगितले.

येत्या काही महिन्यांत त्यांनी पक्ष आणि कारभारावर पकड मिळवली की, त्यांना अधिक मोठे खाते देण्यावर विचार होऊ शकेल. यासंदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस काही उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची शक्यता आहे. युतीत तीन सहकारी पक्ष असताना निधीचे वितरण ही मोठी समस्या असते.

प्रत्येक पक्षाचे समाधान करत आमदारांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पेलू शकतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तसेच अजित पवार असतानाही अर्थ खात्याच्या सर्व फायली फडणवीस यांच्या माध्यमातून समोर जात असत, असेही एका ज्येष्ठ नेत्याने लक्षात आणून दिले.

‌‘अर्थ‌’ नाही तर ‌‘महसूल‌’

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते देणे शक्य नाही; पण निदान महसूल, ऊर्जा-ग्रामविकास असे एखादे दमदार खाते दिले जावे, ही मागणी समोर केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT