मुंबई : एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पंधरा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी विकास संभाजी चव्हाण ( वय 28, रा. सांगली) या आरोपीस मध्य सायबर सेल पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार हे 65 वर्षीय असून ॲण्टॉप हिल येथे राहतात. एप्रिल महिन्यांत त्यांना, दिल्ली पोलीस मुख्यालयातून पोलीस उपायुक्त भुपेशकुमार यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संभाषण करून देण्यात आले. यावेळी त्यांच्या बँक खात्यात दोन कोटींचे मनी लाँडरिंग झाले आहे. ही केस माजी मंत्री नवाब मलिक, हसीना पारकर यांच्याशी संंबंधित असून याच गुन्ह्यांत मनीष यादव या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून त्यांच्या बँक खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.
त्यांच्यावर अटक वॉरंट निघाले असून त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांना काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्याने सांगितलेल्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी मेहुण्याला ही माहिती सांगितली. त्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देत त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यामुळे मध्य सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सांगलीचा रहिवासी असलेल्या विकास चव्हाणला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर त्याने ती रक्कम सायबर ठगांना पाठविली होती. काही सायबर ठगांच्या विकास हा संपर्कात होता. फसवणुकीसाठी त्याने त्यांना बँक खात्याचे डिटेल्स दिले होते.