कोपरखैरणे : खारघर येथे राहणाऱ्या एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची उच्च पदस्थ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 4 कोटी 38 लाख 62 हजार 210 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस कसून तपास करीत आहेत.
तक्रारदाराला 21 नोव्हेंबरला एका समाज माध्यमातून ऑनलाईन संपर्क साधला. संपर्क करणाऱ्या विविध तीन व्यक्तींनी स्वतःची ओळख उच्च पदस्थ पोलीस अधिकारी संदीप राव, प्रदीप जैस्वाल आणि विश्वास नांगरे पाटील असल्याचे भासवले. तुमचा अनेक गुन्ह्यात सहभाग असून डिजिटल अटक केले गेले असल्याचे सांगितले.
आता घराबाहेर पडायचे नाही, कोणाशी संपर्क साधता येणार नाही. अशी बंधने घालण्यात आली तसेच गुन्ह्यांची चौकशी होऊपर्यंत सरकारच्या खात्यात पैसे जमा करा चौकशी झाल्यावर सर्व रक्कम परत तुमच्या खात्यात जमा होईल असे सांगत 21 नोव्हेंबर ते 9 जानेवारी दरम्यान तब्बल 4 कोटी 38 लाख 62 हजार 210 रुपये ऑनलाईन सरकारी खाते सांगत स्वतःच्या खात्यात वळवण्यात आले.
मात्र, आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ हालचाल करीत शहानिशा करून ज्या-ज्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्या मोबाईल क्रमणाच्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.