मुंबई: देशभरात गाजलेल्या सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या संशयित सायबर फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई विमानतळावरून एका वकिलाला अटक केली. रशेष उपाध्याय ऊर्फ रशेष शाह असे त्याचे नाव आहे.
ईडीच्या पणजी विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले.
या अटकेमुळे प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. महाराष्ट्रासह २० राज्यांतील १६० हून अधिक गुन्ह्यांशी या प्रकरणाचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ईडीच्या आरोपानुसार, सायबर फसवणुकीशी संबंधित बँक खाती पोलिसांच्या तक्रारींनंतर गोठविण्यात आली होती.
ही खाती पुन्हा सुरू करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा संशय आहे. या कथित व्यवहारांमध्ये रशेष उपाध्याय हा महत्त्वाचा दुवा असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला. लाचेची रक्कम ‘अंगडिया’ या रोख रकमेची ने-आण करणाऱ्या खासगी नेटवर्कच्या माध्यमातून पोहोचविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांनी ९ जून २०२५ रोजी नोंदविलेल्या गुन्ह्यानंतर सुरू केला. गोव्यातील एका महिलेला २१ मे ते २ जून २०२५ या कालावधीत सरकारी तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधण्यात आला. तिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये २.६० कोटी रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले होते.
रशेष उपाध्याय याला अटकेनंतर पणजी येथे नेऊन विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २९ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
२० राज्यांतील १६० हून अधिक गुन्ह्यांशी संबंध
ईडीच्या माहितीनुसार, या कथित नेटवर्कशी संबंधित बँक खात्यांचा उल्लेख महाराष्ट्रासह २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ३०० हून अधिक तक्रारी आणि १६० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये आढळला आहे.
या प्रकरणांतील नोंदविलेली आर्थिक हानी ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नेटवर्कमधून जवळपास २८ हजार कोटी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याचा, तर सुमारे २,९०० कोटी रुपये रोख स्वरूपात जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.