Digha's new mother-child hospital will be operational soon
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबई महापालिकेच्या दिघा विभागातील महापालिकेच्या ओस वन भूखंडावर 50 खाटांचे सुरु असणार्या माता-बाल रुग्णालयाची इमारत ही पूर्णपणे उभी राहिली असून असून आता अंतर्गत कामे काम सुरू आहेत. तर दिघा विभागातील साठेनगरपासून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताही बनवण्यात आला असून त्यांचेही काम पूर्ण झाले आहे. वर्षाअखेरपर्यंत माता -बाल रुग्णालयाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यावर दिघावांसीयाना आरोग्य सेवेचा दिलासा मिळणार आहे. ऐरोली येथील माता -बाल रुग्णालय किंवा कळवा येथील रुग्णालयात गर्भवती महिलांना जावे लागत होते. आता हा त्रास वाचणार आहे.
दिघा परिसर हा सर्वाधिक झोपटपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. याशिवाय या परिसरात मध्यमवर्गीय आणि गरीब लोकवस्तीचा भागही मोठा आहे. या परिसरातील गर्भवती महिलांना उपचारासाठी, प्रसूतीसाठी ऐरोली रुग्णालय किंवा वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात जावे लागते.
आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने खासगी रुग्णालयांचा खर्च येथील महिलांना परवडणारा नसतो. मात्र ऐरोली रुग्णालय दिघ्यापासून दूर असल्याने अनेक वेळा गर्भवती महिलांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दिघ्यातून ऐरोलीत जाण्यासाठी पहिल्यांदा ठाणे-बेलापूर मार्गावर यावे लागते आणि तिथून रिक्षा किंवा बस पकडून ऐरोलीत पोहोचता येते.
यात वेळ व पैसे दोन्हीचा अपव्यय होतो. दिघा परिसराची लोकसंख्या पाहता या ठिकाणीच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, मनपाने येथे रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या.
त्यासाठी जागेची मोठी अडचण होती. मात्र पाठपुरावा करून, एमआयडीसीकडून भूखंड मिळवण्यात महापालिकेला यश आले. यानंतर मनपाने दिघा परिसरासाठी स्वतंत्र माता-बाल रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून अंतर्गतकामे सुरु आहेत.वर्षाखेरपर्यंत हे काम पुर्ण होऊ शकते, असा विश्वाास महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.