नवी मुंबई: ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे व ऐरोलीच्या मध्ये एमआरव्हीसी च्या माध्यमातून दिघागाव रेल्वे स्थानक साकारण्यात आले आहे.हे रेल्वे स्थानक सुरू होऊन जवळपास दोन वर्षे झाली तरी सद्यस्थितीत दिघागाव रेल्वे स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना ठाणे -बेलापूर मार्ग ओलांडून जावे लागत आहे. जीव मुठीत धरुन पादचारी रस्ता ओलांडत असतात.
पादचाऱ्यांमुळे सकाळ- संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिघागाव रेल्वे स्थानकाच्या चौकात सकाळ संध्याकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. पण दिघा गाव रेल्वे स्थानकासमोर वाहनचालकांसाठी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. पण सिग्नल यंत्रणेचा वापर होत नाही. यामुळे येथे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.
दिघा गाव रेल्वे स्थानक झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडी सुटेल असे वाटले होते. पण याच्या उलट चित्र दिघा गाव रेल्वे स्थानक जवळील चौकात झाले असून येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पुल साकारण्यात यावा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत ठरावाच्या माध्यमातून नगरसेविका ॲड. श्वेता काळे यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका व ठाणे महापालिका यांच्या वेशीवर असणाऱ्या ठाणे -बेलापूर मार्गावर दिघागाव रेल्वे स्थानक साकारण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या ऐरोली नॉलेज पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या असून तिथे हजारो कर्मचारी कामास आहेत. पूर्वेस आनंदनगर, गणपती पाडा, ईश्वरनगर, रामनगर या नागरी वसाहती आहेत. येथील नागरिक मोठया प्रमाणात या रेल्वे स्थानकांचा आधार घेत असतात.
या रेल्वे स्थानकात वाढलेल्या गर्दीमुळे सकाळ संध्याकाळी लोंढेच लेोंढे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असतात. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रोजच कळव्यापासून दिघा परिसरापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. दिघा गाव रेल्वे स्थानक परिसरात नवीन इमारतीही बनत असल्यामुळे तेथीलही लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच होणार आहे.
दिघा गाव रेल्वे स्थानकासमोर पादचारी पुल बांधण्यात यावा यासाठी महापालिकेकडे ठरावाच्या माध्यमातून मागणी केली आहे. पादचारी पुलाअभावी येथे पादचाऱ्यांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. येथील वाहतूक कोंडीही आता नित्याचीच झाली आहे. त्यामुळे येथे पादचारी पुल उभारण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.-ॲड. श्वेता काळे, नगरसेविका