मुंबई : मधुमेह हा चाळिशीनंतर होणारा आजार असल्याची समजूत आता बदलत आहे. तरुण वयातच मधुमेहाचे निदान होण्याचे प्रमाण वाढत असून, सरासरी निदानाचे वय ४३ वरून ३८ वर्षांवर आले आहे. मुंबईतील झांडा हेल्थकेअरच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेकांना कोणतीही लक्षणे नसतानाही नियमित आरोग्य तपासणीत मधुमेहाचे निदान होत आहे.
या विश्लेषणासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२० या कोविडपूर्व कालावधीतील ७ हजार २७४ रुग्णांच्या नोंदींची एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ या कालावधीतील ८ हजार ६९२ रुग्णांच्या नोंदींशी तुलना करण्यात आली. कोविडपूर्व काळात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के होते. कोविडनंतर ते ५८ टक्क्यांवर आले आहे.
नव्याने मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांचे प्रमाण पूर्वी २४ टक्के होते. ते आता ३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. यावरून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.
विशेष म्हणजे, कोविडपूर्व काळात ६५ टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे दिसल्यानंतर निदान होत होते. मात्र, कोविडनंतर ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये नियमित आरोग्य तपासणीदरम्यान मधुमेह आढळला. त्यामुळे लक्षणे नसली तरी वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
मधुमेह व स्थूलताविषयक तज्ज्ञ डॉ. राजीव कोविल यांच्या मते, तरुणांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. दीर्घकाळ काम करणे, मानसिक ताण, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयी यांचा मधुमेहाच्या धोक्याशी संबंध असू शकतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणासोबत नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
मुंबई : राज्यातील ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. १४ मे २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तब्बल ३४ लाख ५ हजार १ नागरिकांना मधुमेहाचे निदान झाले आहे. यापैकी ३३ लाख ५१ हजार ६२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आतापर्यंत ४ कोटी ११ लाख ९१ हजार १४५ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली आहे. निदान झालेल्या रुग्णांपैकी ६ लाख ३४ हजार ६२६ रुग्णांचा नियमित पाठपुरावा करण्यात आला असून, ५ लाख २८ हजार ५२० रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात असल्याची नोंद आहे.
आशा स्वयंसेविकांकडून प्राथमिक तपासणी
या मोहिमेत आशा स्वयंसेविकांकडून ३० वर्षांवरील नागरिकांचे समुदाय आधारित मूल्यांकन केले जाते. उच्च जोखीम आढळलेल्या व्यक्तींना पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जाते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या ३० वर्षांवरील नागरिकांचीही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांकडून तपासणी केली जाते. यामध्ये कौटुंबिक आजारांचा इतिहास, आहाराच्या सवयी, शारीरिक हालचाली, वजन आणि रक्तातील साखरेची तपासणी केली जाते. मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांना समुपदेशनासह औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो.