मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. हिंदू राष्ट्राच्या उभारणीची संकल्पना आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. ते आपल्या गुरूप्रती किती समर्पित होते, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला होता. पण, काही हिंदूविरोधी शक्तींकडून माझ्या वक्तव्याला चुकीचे दाखवण्यात आले. तरीही, माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी माफी मागतो, अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या बेताल वक्तव्यावर माफी मागितली.
छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धाने थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या श्री राम कथा कार्यक्रमापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माफी मागितली.
प्रत्येक सनातनी हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. जगातही त्यांच्याविषयी वाईट बोलणारा कुणी नाही. मी स्वत: स्वप्नातही त्यांच्याविषयी चुकीचे बोलण्याचा विचार करू शकत नाही. त्यांनी या देशासाठी केलेले कार्य महान आहे.
परंतु, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून दुसऱ्यांना त्याचा राजकीय फायदा पोहोचवून देण्यासाठी कायम माझे वक्तव्य चुकीचे दाखवले जाते. मी कुणाचाही अपमान केला नाही, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. मी कधीही अंधश्रद्धा पसरवत नाही. माझी पूजा करा, असेही कुणाला सांगत नाही. श्रद्धेने लोक आपल्या दरबारात येतात, असे शास्त्री म्हणाले.