मुंबई: मुंबईत मुख्यालय असलेल्या आणि एकेकाळी देशातील अग्रगण्य गृहनिर्माण वित्त कंपन्यांपैकी एक असलेल्या 'डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)'च्या ३२ हजार ९३० कोटींच्या कथित बँक कर्ज घोटाळ्यात दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने माजी प्रवर्तक कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि अन्य आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशामुळे बहुचर्चित घोटाळ्याचा खटला आता प्रत्यक्ष सुनावणीच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, सीबीआय आणि ईडीच्या तपासालाही नवी दिशा मिळाली आहे.
सीबीआयच्या आरोपानुसार, १७ बँकांच्या कर्जदाता समूहाची सुमारे ३२ हजार ९३० कोटींची फसवणूक करण्यासाठी डीएचएफएलमधील निधी कथितरीत्या शेल कंपन्या, बनावट गृहकर्ज खाती आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून वळविण्यात आला.
या प्रकरणात विशेष न्यायालयाने यापूर्वी १८ व्यक्ती आणि ५७ कंपन्या-संस्थांसह एकूण ७५ आरोपींना समन्स बजावले होते. आता आरोप निश्चित झाल्यानंतर सरकारी पक्ष दस्तऐवजी पुरावे आणि साक्षीदार न्यायालयासमोर सादर करणार असून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी कपिल वाधवान सध्या न्यायालयीन कोठडीत असून, धीरज वाधवान याला वैद्यकीय कारणांवर जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात ११ आरोपी माफीचे साक्षीदार (अॅप्रुव्हर) बनल्याने सीबीआयच्या बाजूला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, ईडीकडून या प्रकरणातील कथित मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू असून, मुंबईतील १५४ फ्लॅट्ससह सुमारे २५६ कोटींच्या मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आल्या आहेत. कथित गैरव्यवहारातील पैशांचा प्रवाह, परदेशातील व्यवहार, लाभार्थी आणि शेल कंपन्यांचे जाळे उघड करण्यावर ईडीचा भर राहणार आहे.
तसेच, तपासात नव्या बाबी समोर आल्यास पूरक आरोपपत्र दाखल होण्याचीही शक्यता आहे. सीबीआयला न्यायालयात आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि माफीच्या साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे आरोप सिद्ध करावे लागणार आहेत.
डीएचएफएल प्रकरण एका नजरेत
कथित घोटाळा : ३२,९३० कोटी
कर्जदाता : १७ बँकांचा समूह
आरोपी : १८ व्यक्ती, ५७ कंपन्या/संस्था
प्रमुख आरोपी : कपिल वाधवान (कोठडीत), धीरज वाधवान (वैद्यकीय जामिनावर)
माफीचे साक्षीदार : ११
ईडीने जप्त केलेली मालमत्ता : १५४ फ्लॅट्ससह २५६ कोटींची मालमत्ता