मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या निकषांना छेद देत, धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील महामुंबई प्रदेशात (धारावीत नव्हे) घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता तळमजल्यावरील सदनिकाधारकाच्या पात्रतेवर अवलंबून असेल.
4 ऑक्टोबर 2004 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी धारावीत वास्तव्यास असलेल्या वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील पुनर्विकासात सामावून घेतले जाणार आहे.
या सदनिकाधारकांना धारावीबाहेर, मात्र मुंबई महानगरप्रदेशात (एमएमआर) 300 चौरस फुटांचे घर मिळू शकेल. त्यासाठी त्यांना भाडेकरार - खरेदी (हायर-परचेस) योजनेचा लाभ घेता येईल; किंवा 25 वर्षांसाठी नाममात्र भाडे भरून 26 व्या वर्षी घराचा मालकी हक्क मिळवता येईल. तसेच उर्वरित रक्कम अदा करून 25 वर्षांच्या कालावधीत कधीही घराचे मालक होता येईल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकाऱ्याने सांगितले.
“वास्तविक, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना कोणताही लाभ नदेता प्रकल्पातून वगळले जाते. मात्र, धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पुनर्विकासात सामावून घेतले जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
पात्रतेच्या प्राधान्यक्रमातील शेवटच्या पर्यायात जर तळमजल्यावरील सदनिकाधारक आपली पात्रता सिद्ध करू शकला नाही, तर वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता देखील धोक्यात येऊ शकते. अशावेळी पात्रतेसाठी कोणतेही प्रतिज्ञापत्र विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती डीआरपी अधिकाऱ्यांनी दिली.
वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज आणि त्यांचा प्राधान्यक्रम
प्राधान्यक्रम-1 : वरच्या मजल्यावरील कुटुंबप्रमुखाच्या नावे असलेले विजेचे बिल. कट ऑफ डेट पूर्वीचे आणि अलीकडचे वीजबिल आवश्यक.
प्राधान्यक्रम-2 : वरच्या मजल्याचा पत्ता नमूद असलेला नोंदणीकृत भाडेकरार. कट ऑफ डेट पूर्वीचा आणि अलीकडचा भाडेकरार आवश्यक.
प्राधान्यक्रम-3 : वरच्या मजल्याचा पत्ता नमूद असलेला नोंदणीकृत खरेदी करार आणि नोटरी केलेले संमतीपत्र. कट ऑफ डेट पूर्वीचा आणि अलीकडचा करार आवश्यक आहे.
प्राधान्यक्रम-4 : कट ऑफ डेट पूर्वी, वरच्या मजल्याचा पत्ता नमूद केलेले आधारकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र.
प्राधान्यक्रम-5 : वरच्या मजल्यावरील कुटुंबप्रमुखाचे प्रतिज्ञापत्र आणि तळमजल्यावरील कुटुंबप्रमुखाचे या संदर्भातील प्रमाणपत्र. यासाठी तळमजल्यावरील सदनिकाधारक पात्र असणे आवश्यक आहे.