मुंबई: आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या आणि १० लाखांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या धारावीतील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, सोमवारी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (एईएल) संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर भूमिपूजन पार पडले.
या भूमिपूजन समारंभाला नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डीआरपी/एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. महेंद्र कल्याणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही) असलेली अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) मूळ जागी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देणार आहे.
‘‘प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित वाटेल आणि भविष्याचे नियोजन करता येईल, असे घर मिळायला हवे. धारावीतील कुटुंबांसाठी याचा काय अर्थ आहे, हे आम्ही जाणतो. माटुंगा येथे आम्ही १० इमारतींमध्ये १०,४३२ घरे आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळे उभारत आहोत, असे प्रणव अदानी म्हणाले.
सेक्टर ६ आणि १ मधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळतील. त्यानंतर सुमारे ४,५०० सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जाणार आहेत.
या १० इमारती तीन टप्प्यांत महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (डीआरपी/एसआरए) हस्तांतरित केल्या जातील. पहिल्या पाच इमारती मार्च २०२९ पर्यंत, त्यानंतरच्या दोन इमारती ऑगस्ट २०२९ पर्यंत, तर उर्वरित तीन इमारती ऑगस्ट २०३० पर्यंत हस्तांतरित होतील.
डॉ. कल्याणकर म्हणाले, ‘‘धारावीतील कुटुंबांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयीसुविधांसह सुरक्षित, आधुनिक घरे देण्यावर आमचा भर आहे.’’
या भूमिपूजनाच्या काही दिवस आधी, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन झाले.
२२,५०० चौरस फुटांवर उभारलेल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष आकाराचे सॅम्पल फ्लॅट्स, थ्री डी वॉक थ्रू आणि संवादी प्रदर्शने आहेत. त्यांतून निवास, कामाच्या जागा, सोयीसुविधा, वाहतूक आणि मोकळ्या जागा यांची माहिती देऊन रहिवाशांना प्रस्तावित पुनर्विकासाची झलक मिळते.