Dharavi Redevelopment Project Pudhari
मुंबई

Dharavi Redevelopment Project: धारावीत पात्रता पडताळणीसाठी सेक्टरनिहाय शिबिरे घेणार

एसआरएचे आश्वासन, भर उन्हात निघाला रहिवाशांचा प्रचंड मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धारावी पुनर्वसन प्रकल्पात पात्रतेचा निर्णय झालेला नाही, अशा रहिवाशांच्या बाबतीत पडताळणी करण्यासाठी सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी धारावीकरांच्या मोर्चानंतर धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ही ग्वाही दिल्याचे समजते.

धारावीमधील प्रत्येक झोपडपट्टीवासियास 500 चौ. फू.चे घर मिळालेच पाहिजे. याचे लेखी आश्वासन सरकार-अदानी कंपनीने द्यावे यासाठी सोमवारी तळपत्या, रणरणत्या उन्हात एक प्रचंड मोर्चा निघाला. विधान परिषदेमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, माजी महापौर श्रध्दा जाधव आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

धारावीच्या कुंभारवाडा येथील हॉटेल बिस्मिल्ला येथून निघालेला हा मोर्चा साहिल हॉटेल चौकात पोलिसांनी अडवल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यानंतर अंबादास दानवे यांच्यासह 25 जणांचे शिष्टमंडळ पोलीस आणि खाजगी वाहनांमधून एसआरए कार्यालयाकडे रवाना झाले. धारावी बचाव आंदोलन संघटनेच्या वतीने निवेदन एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना देण्यात आले.

येत्या काळात धारावी प्रकल्पाची सेक्टर निहाय माहित रहिवाशांना व स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली जाईल, असे आश्वासन डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्याचे समजते. पात्रतेच्या निकषात अनिर्णित असलेल्या आणि पात्रता निश्चित न झालेल्या प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

त्यामुळे पात्रता निश्चितीला वेग येईल असे कल्याणकर यांनी आश्वस्त केल्याचे समजते. पात्र रहिवाशांची सेक्टर निहाय माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून ही माहिती लवकरच रहिवशांना दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. शिष्टमंडळाचे म्हणणे डॉ. कल्याणकर यांनी ऐकून घेतले. धारावी बचाव आंदोलन संघटनेसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासनही कल्याणकर यांनी दिले.

धारावीमध्ये झोपडपट्टीवासियांबरोबर पात्र- अपात्रेच्या खेळ करीत बसू नका. धारावी हे श्रमिकांचे नगर असून सर्वांनाच या धारावीतच घरे द्या. कोणालाही धारावी बाहेर घर देण्याचे मनात आणू नका. नाही तर या विरोधात ठाकरे गट उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.

ज्या जमिनीवर एसआरए प्रकल्प तेथेच झोपडपट्टीचा विकास हे सूत्र आहे. पण झोपडपट्टी धारावीत आणि अदानी कंपनीस जमीन दहिसर,मुलुंड देवनारला हे विसंगत आहे. सर्व पात्र-अपात्र धारावीकरांना घराला घर, दुकानाला दुकान मिळाले पाहिजे. नाहीतर येथील संतप्त लोक एकही विट रचू देणार नाही असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी यावेळी दिला.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

  • धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीने धारावीचा एक परिपूर्ण आराखडा-मास्टर प्लॅन धारावीच्या चौका चौकात लावावा. लोकांच्या मोबाईलवर तो व्हाट्सअपवर टाकावा.

  • या प्लॅनवर धारावीमधील झोपडपट्टीवासियांना आपल्या हरकती, सूचना नोंदवण्यासाठी वेळ द्यावा. आणि सर्व पात्र अपात्र लोकांना धारावीतच 500 चौरस फुटाचे घर द्यावे.

  • अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने धारावीतील प्रत्येक झोपडपट्टीवासियाबरोबर करार करावा. धारावी मेघवाडीत बिल्डिंगचे काम रात्रीही सुरू असते. त्यामुळे लोकांची झोप होत नाही. मेघवाडीतील रात्रीच्या कामावर बंदी घालावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT