Mumbai Crime News Pudhari
मुंबई

Crime News: एकाच चिमुकल्याची दोनदा विक्री; तामिळनाडूतून दीड वर्षांच्या मुलाची सुटका

वडिलांनी एक लाखांना विकल्याचा आरोप; पुढे ४.८० लाखांत सौदा, धारावी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आईच्या कुशीत खेळण्याच्या वयात असलेल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला पैशांसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार धारावी पोलिसांनी उघडकीस आणला. वडिलांनीच मुलाला एक लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

त्यानंतर या मुलाचा पुन्हा ४ लाख ८० हजार रुपयांना सौदा करण्यात आला आणि त्याला तामिळनाडूत नेण्यात आले. धारावी पोलिसांनी तामिळनाडूतून मुलाची सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

या प्रकरणाची सुरुवात ८ ऑगस्टला झाली. मुलाचा काका सनी सिंग याला पुतण्या दिसत नसल्याने त्याने धारावी पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला कुटुंबीयांनी मुलाला डोक्याला दुखापत झाल्याने सायन रुग्णालयात नेल्याचे सांगितले होते. त्यामुळे सनी रुग्णालयात गेला. मात्र, तेथे मुलगा नव्हताच.

मुलाचा शोध घेत तो घरी परतला. तेव्हा मुलाच्या आईने मुलाला विकल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे ऐकून सनीला धक्काच बसला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तपास सुरू करून मुलाचे वडील संदीप सिंग याला अटक केली. चौकशीत तो बेरोजगार होता आणि पैशांची गरज असल्याने त्याने मुलाला एका महिलेला एक लाख रुपयांना विकल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे.

तपास पुढे जात असताना पोलिसांना शबनम खान ऊर्फ राणी हिची माहिती मिळाली. ती या व्यवहारातील मध्यस्थ असल्याचे समोर आले.शबनम हिने यापूर्वी आयव्हीएफ ( IVF ) केंद्रात काम केले होते. तेथील ओळखींच्या माध्यमातून मुलाला दत्तक घेण्यास किंवा विकत घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम ती करत होती.

एक लाखांचा मुलगा ४.८० लाखांत

पोलिसांच्या माहितीनुसार, शबनमने मुलाचा पुढे ४ लाख ८० हजार रुपयांना सौदा केला. त्यानंतर काही जणांच्या मदतीने मुलाला तामिळनाडूत नेण्यात आले. तेथे एका दाम्पत्याने त्याला विकत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुलगा घरापासून दूर तामिळनाडूत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

आईच्या मायेपासून दूर गेलेला चिमुकला पुन्हा सुरक्षित

दीड वर्षांचे मूल नीट बोलूही शकत नाही. आई-वडिलांपासून दूर नेले गेले तरी काय घडत आहे, हे समजण्याचे त्याचे वय नाही. मात्र, बापाने पैशांसाठी त्याच्या आयुष्याचा सौदा केल्याचा आरोप आहे. मुंबईतून तामिळनाडूपर्यंत नेण्यात आलेल्या चिमुकल्याला अखेर धारावी पोलिसांनी शोधून काढले. सध्या त्याला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे मुलांची बेकायदा विक्री आणि दत्तक देण्याच्या नावाखाली होणाऱ्या व्यवहारांचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT