मुंबई : ‘आज धारावीतील मेघवाडी गणेशनगरमधील रहिवाशांवर धारावीबाहेर जाण्याचे संकट आलेले आहे. उद्या हे संकट धारावीमधील कुंभारवाडा, कोळीवाडा,आझादनगर, टिळकनगर आदी वस्त्यांवरही येऊ शकते. म्हणून धारावीकरांनो जागते रहो! धारावीकरांनो सतर्क राहा!’, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेते माकपचे प्रकाश रेड्डी, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आपच्या प्रिती मेनन यांच्यासह सर्वच नेत्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीतच काही दिवसांपूर्वी सभा झाली होती.धारावीतील लोकांना धारावीतच घरे देणार असे आश्वासन या सभेत त्यांनी दिले होते.पण या सभेनंतर काही दिवसातच मेघवाडी गणेशनगरमधील झोपड्या तोडण्याचा इशारा राज्य सरकारच्या एसआरएने दिला आहे.या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कामराज हायस्कूलसमोर धारावी बचाओ आंदोलन या संघटनेची प्रचंड इशारा जनसभा झाली.
या इशारा सभेला धारावी बचाव आंदोलनाचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाबुराव माने, आमदार महेश सावंत शेकापचे राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, आपचे एन.आर.पॉल, डॉ.जावेद खान, राष्ट्रवादी शपचे उलेश गजाकोष, अरिफ सय्यद, वंचितचे अनिल कासारे, माकपचे शैलेंद्र कांबळे, संगीता कांबळे, बसपाचे जैस्वार आदींसह धारावीच्या कानाकोपऱ्यातील असंख्य रहिवाशी उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिला प्रचंड मोर्चा उध्दव ठाकरे यांनी काढला होता.आता मोठ्या प्रमाणात धारावीतील रहिवाशांना अपात्र करुन धारावीकरांना धारावीच्या बाहेर फेकण्याचे कारस्थान त्वरीत थांबवले नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गट धारावीच्या मागे उभा करील. धारावीकर हे धारावीच्या बाहेर जाणार नाहीत.मेघवाडीतील रहिवाशांनी आपली घरे खाली करु नयेत.आम्ही धारावी सोडणार नाही.उलट अदानीलाच धारावी बाहेर पळवून लावा असे आवाहन माकपचे प्रकाश रेड्डी यांनी केले. आज एक वस्ती हटविण्याची नोटीस आली उद्या धारावीतील इतर वस्त्याही हटविण्याची नोटीस येईल यापासून लोकांनी सतर्क सावध राहावे असे आवाहन कॉ.प्रकाश रेड्डी यांनी यावेळेस केले.
देवणार, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमिन अदानी कंपनीने घेतली ती तेथे धारावीतील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी घेतली आहे.धारावीत फक्त 5- 10 हजार लोकांना घरे द्यायची आहेत.बाकीचे लोक धारावीबाहेर फेकायचे आहेत.आणि यातून धारावीची जवळपास 500 जमिन हडप करायची आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनी केला.म्हणून धारावीतील लोकांनी सावध राहिले पाहिजे. जागते रहो असे माझे आवाहन आहे, असेही माने म्हणाले.
आमदार महेश सावंत म्हणाले, मेघवाडीतील रहिवाशांशी सरकारने करार करावा. अग्रीमेंट करावे. त्यांना हक्काचे घर द्यावे. नाहीतर येथील लोकांनी कोणत्याही परिस्थितीत मेघवाडी खाली करु नये. यासाठी मी तुमच्यासोबत राहीन असे आश्वासन सावंत यांनी दिले. आपच्या प्रिती मेनन म्हणाल्या, धारावी हे मुंबईचे ह्रदय आहे. याच्याशी अदानीने पंगा का घेतला. एक दिवस सरकारला धारावीतील लोकांसमोर गुडघे टेकावे लागतील.