Dhangar Reservation Protest Pudhari
मुंबई

Dhangar Reservation Protest: धनगर आरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन : मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईत इशारा

“ताकद दाखवा, आरक्षण मिळवा”; मराठा समाज पाठिशी उभा राहणार असल्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : धनगर समाजाला अनूसूचित जमाती (एस. टी) आरक्षण मिळण्यासाठी आक्रमकपणे लढाई केली पाहिजे. ही लढाई तेवढी सोपी नाही, त्यासाठी धनगर समाजाची एकजुट महत्त्वाची आहे. मतभेद विसरुन एकत्र या, मुंबईत ताकद दाखवा व आरक्षण घेऊनच जावे, यासाठी मराठा समाज तुमच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिल, असे आश्वासन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत मंगळवारी दिले. ते दीपक बोऱ्हाडे यांच्या आझाद मैदानातील उपोषणस्थळी बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे-पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाच्या पाठोपाठ धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दोन कोटी इतकी आहे. एस टी आरक्षण मिळवायचे असेल तर एकाही धनगर समाज बांधवांने घरामध्ये थांबता कामा नये. त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात यावे. तुमची ताकद दिसली तरच सरकार खडबडून जागे होईल आणि आरक्षणाचा विचार करेल. ही लढाई तुमच्या लेकरा-बाळांसाठी आहे. त्यांना मोठे करायचे आहे.

याचबरोबर मी स्वत:उद्यापासून धनगर समाजाचे नेते यांच्याशी आरक्षणासंदर्भांत बोलणार आहे. ते काय बोलले हे ही तुम्हाला सांगतो, मला यात कमीपणा वाटत नाही. आम्ही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आंदोलक दीपक बोऱ्हाडे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, आरक्षण द्या उपोषण सोडतो. मला कोणतेही राजकारण करायचे नाही.

गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला बीड जिल्हयातील आमदार प्रकाश सोळंके यांनी मंगळवारी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. त्यांच्यासह अनेकांनी बोऱ्हाडे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT