https://youtu.be/2qyewrlQEsw?si=XjhtB_vDGe7d1j8dDhananjay Munde Ministry :
राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलांमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. संतोष देशमुख प्रकरणात ज्या मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता, त्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे 'इन' होत असताना दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ मात्र 'आऊट' होण्याची शक्यता आहे.
मंत्रीमंडळातील या अचानक बदलामागं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मोठे कारण आहे. राज्यात आता जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी नेतृत्वाचा वापर करू इच्छित आहे. बीड जिल्ह्याचा विचार केल्यास, धनंजय मुंडे यांचा या भागात चांगला प्रभाव आहे. सध्या या क्षेत्रात प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे, मुंडेंना संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक चांगल्या जागा निवडून आणू शकते.
काही दिवसांपूर्वी मुंडेंनी स्टेजवर बोलताना तटकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. त्यांनी 'रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या' अशी मागणी केली होती. मुंडेंची ही मागणी आणि दुसरीकडे असलेल्या निवडणुका, या दोन्ही गोष्टी विचारात घेऊनच हे मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या फेरबदलांदरम्यान तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत नाराज असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांचा वापरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केला जाणार आहे. सावंतांसाठी भरत गोगावले यांना मंत्रीपदाचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, भाजपामधूनही किमान दोन मंत्री बदलले जाणार आहेत, आणि दोन कर्तृत्ववान आमदारांना मंत्री केले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.