मुंबई : गौरीशंकर घाळे
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे यश हे निर्विवाद स्वरूपाचेच हवे. त्यासाठी संघटनात्मक कामावर भर द्या. केंद्र आणि राज्य सरकारची कामे संघटनेच्या माध्यमातून खाली पोहोचतील यासाठी दक्ष राहा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या नवनियुक्त सरचिटणीसांशी बोलताना केले.
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने चार सरचिटणीसांची निवड केली होती. राजेश शिरवाडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळकर या चार नवनियुक्त सरचिटणीसांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मागील पालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होता. मुंबईत आपला महापौर बसविण्याचा भाजपचा मनसुबा थोडक्यात हुकला होता. शिवाय, युतीच्या तत्कालीन राजकारणामुळेही भाजपने मुंबईचे महापौरपद आणि सत्ता उद्धव ठाकरेंसाठी सोडली. आता मात्र समीकरणे बदलली आहेत. यंदाच्या निवडणुकीनंतर मुंबईत आपलाच महापौर बसवायचा असा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नवनियुक्त सरचिटणीसांना निर्विवाद यशाचा कानमंत्र दिला.
या निवडणुकीतील भाजपचे यश निर्विवाद स्वरूपाचेच असेल यादृष्टीने व्यूहरचना करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यासाठी संघटनात्मक कामांकडे विशेष लक्ष द्यावे. संघटनेच्या ताकदीवर मुंबईतील निर्विवाद यशाला गवसणी घालणे शक्य आहे. विशेषतः केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला हवीत, असेही फडणवीसांनी सांगितले.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांपूर्वीच आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून मुंबई भाजपच्या कार्यकारिणीच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. मात्र, ऐन निवडणुकीत नाराजीनाट्याला निमंत्रण नको म्हणून केवळ चार सरचिटणीसांची नियुक्ती करून त्यांच्याच माध्यमातून संघटनात्मक कामे मार्गी लावण्याचे धोरण भाजपने स्वीकारलेले दिसते.