Devendra Fadnavis on Rahul Gandhi
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो, मात्र भाजप जिंकला तर निवडणूक आयोग खराब कसा होतो?" असा सवाल करत तिन्ही निवडणूक आयुक्तांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे राहुल गांधी त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटिव्ह हा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. हे देशात मत चोरी झाल्याचे म्हणत आहेत मात्र यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. त्यांची मानसिकता अति डावी झाली आहे. त्यांना अति डावी राजवट आणायची आहे. संविधान दाखवणाऱ्यांना लोकशाही मान्य नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशाणा साधला.
निवडणूक आयुक्तांनी मंत्रिमंडळाला पाठवलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी एसआयआरची सर्व प्रक्रिया एकमतानेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. फॉर्म नंबर ६ बाबत संभ्रम निर्माण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.
संविधानावरून विश्वास उडवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे. जनतेमध्ये विश्वास निर्माण करता येत नाही म्हणून व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कितीही प्रयत्न केला तरी येथे साम्यवादी राजवट आणता येणार नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
विरोधी पक्ष जेव्हा निवडणुकीत हरतात त्यानंतर निवडणूक आयोगावर खापर फोडतात. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो, मात्र भाजप जिंकला तर निवडणूक आयोग खराब होतो. ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच निवडणूक आयोगानेही 'ईव्हीएम हॅक करून दाखवा', असे आव्हान दिले होते. त्यासाठी १५ दिवसांचा कालावधीही दिला, मात्र तेव्हा कोणीच आव्हान स्वीकारले नाही. आता विरोधी पक्षांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असेही फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्ष 'मत चोरी' म्हणतात, मात्र विरोधकांचा मेंदूच चोरीला गेला आहे, आता पंतप्रधानांनी यांच्या मेंदूवर उपचारासाठी उपाययोजना करावी, असा टोला लगावत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. मग एसआयआरवर पराभवाचे खापर कसे फोडता? असा सवालही त्यांनी केला.
२६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या तालुक्यांत सरसकट मदत जाणार आहे. यातील १२ उपाययोजना या तातडीच्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोणताही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. दुष्काळ परिस्थितीत संवेदनशीलता ठेवावी लागते. खर्च कमी करावा लागतो.
दुष्काळ परिस्थितीत संवेदनशीलता ठेवावी लागते. खर्च कमी करावा लागतो. प्रत्येक जिल्ह्याला पाण्याचा आराखडा करायला लावला. काही धरणांमध्ये पुरसा पाणीसाठा आहे. त्या त्या जिल्ह्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी वाटपाचा निर्णय होईल. एल निनोबाबत तज्ज्ञांच्या मते तो फेब्रुवारीपर्यंत राहील. त्यानंतर तो कमी होईल. एल निनोचा इफेक्ट वाढला तर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचीही आम्ही तयारी करत आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.