CM Devendra Fadnavis 
मुंबई

CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका; मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा

CM Devendra Fadnavis | वंदे मातरम्‌ला विरोध हा 'दिमागी नक्षलवाद'

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'वंदे मातरम्' गीत पूर्णपणे गाण्यापासून सोनिया गांधी यांनी रोखल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

'वंदे मातरम्‌ला विरोध हा दिमागी नक्षलवादच आहे', अशी टीका फडणवीस यांनी केली. मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बंदूक असलेला नक्षलवाद संपला आहे.

मात्र, त्याहून खतरनाक असलेला दिमागी नक्षलवाद आता पाहायला मिळत आहे. ज्या लोकांच्या डोक्यात अराजकता भरली आहे, असा नक्षलवाद दुर्दैवाने पाहायला मिळत आहे. त्याचा एक नमुना काँग्रेसच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

देशाच्या एकूण निर्णयप्रक्रियेत १५ ऑगस्टला संपूर्ण 'वंदे मातरम्' वाजविण्याचा निर्णय हा संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत घेण्यात आला आहे. असे असताना संपूर्ण 'वंदे मातरम्' वाजविल्याने सोनिया गांधी नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत असतील, तर हा 'दिमागी नक्षलवाद' नाही तर काय, असा सवाल फडणवीस यांनी केला. ही अराजकता आणि संवैधानिक शक्तीचा अपमान नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संविधान संशोधनाला विरोधाची भूमिका अयोग्य : मुख्यमंत्री

एकीकडे महिला आरक्षणाचे समर्थन आणि दुसरीकडे आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या राज्यघटना दुरुस्तीला विरोध, ही भूमिका अयोग्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना यावेळी टोला लगावला.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, २०२३ मध्ये संविधान संशोधन करून महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या कायद्यात दोन पूर्वअटी घालण्यात आल्या आहेत. प्रथम जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, अर्थात डिलिमिटेशन पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होऊ शकते. त्यामुळे जनगणना आणि डिलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार नाही.

२०२९ मध्ये महिलांना आरक्षण द्यायचे असेल, तर जनगणना आणि त्यानंतर डिलिमिटेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. महिला आरक्षण आणायचे असेल आणि त्याला तुमचं समर्थन असेल, तर संविधान संशोधनाला मान्यता द्या. दोन-तृतीयंश बहुमताने ते मंजूर करा. तरच २०२९ मध्ये महिलांना आरक्षण मिळू शकेल. नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशी भूमिका विरोधकांनी घेऊ नये, असा घनाघात फडणवीस यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT