मुंबई ः कर्जमाफी संदर्भातील निकष फार किचकट असणार नाहीत. हे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. समिती या संदर्भात काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्राची 81 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते. त्यापैकी 51 लाख हेक्टर म्हणजेच 70 टक्के सिंचन क्षमता निर्माण केल्याचा दावाही त्यांनी केला. फडणवीस यांनी 6 मार्च रोजी राज्याचा सन 2026 - 2027 चा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राज्याचा जलआराखडा तयार केला असून त्यात अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर आहे. नदीजोड प्रकल्प सुरु होण्याआधी तयार केलेला हा आराखडा असून त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र जून 2024 आणि अलीकडचे बांधकामाधीन प्रकल्प पाहता राज्यात 57 लाख हेक्टर म्हणजेच 70 टक्के सिंचन क्षमता तयार केली आहे.
मराठवाड्याची 17 लाख हेक्टर सिंचन क्षमता असून त्यापैकी 12 लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार केली आहे.दोन लाख 43 हजार हेक्टर सिंचन क्षमतेची कामे सध्या सुरू आहेत. राज्यातील 110 लघु आणि 67 मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय नदीजोड प्रकल्प वेगाने पुढे जात असून उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात येण्याच्या प्रकल्पाद्वारे 78 टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेण्यात येईल. हा 87 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून चार महिन्यांत सर्व मान्यता देण्यात येतील, असे ते म्हणाले.
जलजीवनसाठी निधी मिळेल
जलजीवन मिशन अडचणीत आहे हे खरे आहे. मात्र ,केंद्र सरकारने 8.69 लाख कोटी रुपये कालच मंजूर केले आहेत. राज्यातील 15 हजार कोटींची जलजीवन मिशनची देणी आहेत. मात्र यंदा 12 हजार 800 कोटी रुपये लवकरच मिळतील, असे उत्तरादरम्यान त्यांनी सांगितले.