Political News pudhari photo
मुंबई

Political News: मोदींच्या आवाहनाला जनता योग्य प्रतिसाद देईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज पुरवठा सुरळीत असला तरी भविष्याचा विचार करून आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आखाती देशांतील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरातील अनेक देशांत तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला या गोष्टींचा योग्य पुरवठा होत आहे. आपल्याला गॅस, तेल या सर्व गोष्टी मिळत आहेत.

पण, हे संकट समजून घेत या साधनांचा योग्य वापर केला नाही, तर आपल्याला तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी आवाहन केले असून, जनता त्याला योग्य प्रतिसाद देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांची समजच कमी असल्याचा पलटवार त्यांच्या टीकेवर केला.

पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेलाची काटकसर करतानाच वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशवासीयांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपण या संकटाला समजून घेतले नाही आणि याचा वापर योग्यरीतीने केला नाही, तर आपल्यालाही तुटवड्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे पंतप्रधानांनी जे सांगितले आहे ते महत्त्वाचे आहे. या गोष्टींचा अमर्याद वापर करता येणार नाही. पुरवठा साखळीची परिस्थिती पाहता आणि परकीय चलन आपल्याला कसे वाचविता येईल याकरिता मोदी यांनी केलेले आवाहन योग्य आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, हीच आमची भूमिका आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पक्षात कोणी मानत नाही

काँग्रेसची अवस्था अशी आहे की, त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या पक्षातले कोणी मानत नाही. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेऊ शकत नाही, राज्यातल्या नेतृत्वाला सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. हाच प्रकार आधी कर्नाटकात आपण पाहिला आहे आणि आता तसेच केरळमध्ये होणार आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

मोदी यांच्यामुळे पेट्रोल-डिझेल,गॅसचा योग्य पुरवठा

नागपूर व राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन सुरू झाले आहे. पाकिस्तानात 450 रुपये लिटर पेट्रोल दर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅस याचा आपल्याला योग्य पुरवठा सुरू आहे. पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT