मुंबई : विद्यमान आमदारांविरोधातील नाराजी मोजण्यासाठी भाजपने काही निकष निश्चित केले होते. त्यात तीन-चार पद्धतींचा वापर करत एक मीटर तयार केले. यात ज्यांची कामगिरी पन्नास पेक्षा खाली होती त्या विद्यमान आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला. तर, ज्यांची कामगिरी पन्नास टक्क्यांहून अधिक होती त्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर करताना भाजपने बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा करताना फडणवीसांनी उमेदवारीसाठीचा निकष सांगितला. त्याचवेळी या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरणार असल्याचाही दावा केला. या निवडणुकीत महायुतीला अनुकूल वातावरण आहे. भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांसह सरकार बनवू, इतके बहुमत आम्हाला असेल. लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह तयार केला. आम्ही त्याला स्ट्रेट ड्राईव्हने उत्तर दिले आहे. आता ते खोटे बोलत आहेत, हे लोकांना समजले आहे. मोदी सत्तेत आले तर राज्यघटना बदलतील, आरक्षण संपवतील असा त्यांनी प्रचार केला. त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीतला मतदान केले. त्यानंतर राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. त्यांचे खोटे उघडे पडले आहे. शिवाय, जिहाद हा लोकसभा निवडणुकीतील फॅक्टर होता. एका विशिष्ट समूहाच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान केले. हे यंदा चालणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.