Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: ...तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिले नसते; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर

Fadnavis on Raj Thackeray statement: फडणवीस यांनी शुक्रवारी पलटवार करत राज ठाकरे जर मिमिक्री क्षेत्रात असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिले नसते, असा खोचक टोला लगावला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सभागृहात विरोधकांना धमक्या आणि हिंदीतून केलेल्या भाषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर फडणवीस यांनी शुक्रवारी पलटवार करत राज ठाकरे जर मिमिक्री क्षेत्रात असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिले नसते, असा खोचक टोला लगावला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनी कनेक्टिंग लिंकच्या कामावर केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा हिंदीतूनही समाचार घेतला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

मुख्यमंत्री आहात ना, धमक्या काय देता? अशा शब्दांत सुनावताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मिमिक्री केली होती. ती समाजमाध्यमांवर प्रचंड व्‍हायरल झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंच्या टीकेला अतिशय तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले.

विधानसभेत मी परवा भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिरच्या झोंबल्या आहेत. खरे म्हणजे, मी अतिशय स्पष्टपणे सांगितले होते की, मिसिंग लिंकवरील जो पूल आहे, त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे टनेल्स आहेत.

याला एकही तडा गेलेला नसताना आणि कोणतेही नुकसान झाले नसतानादेखील ७ हजार कोटी पाण्यात गेले, अशी टीका करण्यात आली; मग हा माझा अपमान आहे का? हा महाराष्ट्राचाच अवमान आहे. खोट्या बातम्या पेरणे किंवा खोट्या बातम्या पसरविणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

...तर मग सुपारीबाज म्हणतो

मी परवा विधानसभेत बोलता-बोलता हिंदीत बोललो की, ‘भाडे के टट्टू’ तर मला काहीजण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होते. त्यामुळे मी थोडा अभ्यास केला.

आता मी माझे ‘भाडे के टट्टू’ हे शब्द परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे ‘भाटक गर्दभ’ म्हणतो. तरीही कोणाला समजले नसेल, तर मग सुपारीबाज म्हणतो. मात्र, मी तर काही सुपारीबाजांबाबत बोललो होतो. मी फक्त टोपी फेकली होती, तरीदेखील अनेकांना ती टोपी लागली, असा हल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी चढविला.

दुसऱ्यालाच मिरची लागली

मी एक वाक्य हिंदीत बोललो. मी ते वाक्य ज्यांना समजायला पाहिजे होते म्हणून बोललो होतो, तर दुसऱ्यालाच मिरची लागली आणि मग आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले की, तुम्ही हिंदीत का बोलला? खरे तर संपूर्ण भाषण मी मराठीत केले; पण तरीही मला काहीही अडचण नाही.

ते माझे मित्रच आहेत. ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही; पण ते राजकारणात आहेत याचा आनंद आहे. मात्र, जर ते मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिले नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT