Devendra Fadnavis Rajbhasha Sammelan : "माझी मातृभाषा म्हणजेच आई मराठी भाषा आहे तर अन्य भाषा माझ्या मावशी आहेत. इतर भाषांचा सन्मान केला नाही, तर आपल्या भाषेचा सन्मानही कोणी करणार नाही. मातृभाषेबरोबर किमान एक तरी अन्य भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. हिंदीसोबत अन्य भारतीय भाषाही शिकल्या पाहिजेत," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज (दि. १४ सप्टेंबर) नवी मुंबई येथे आयोजित सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते बोलत होते.
हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी भाषा आणि साहित्याला आणखी उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर देशातील सर्व भाषांचा सन्मान राखला पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
इंग्रजीसोबत हिंदीलाही राजभाषेचा दर्जा मिळाला आणि देशाच्या कामकाजात हिंदीचा वापर वाढला. मातृभाषा आणि राजभाषेचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कायम ठेवला आहे. मातृभाषेसोबत राजभाषा आणि अन्य भारतीय भाषा शिकल्यास व्यक्तीच्या प्रगतीच्या अधिक संधी निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले.
सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. देशाच्या कामकाजात इंग्रजीसोबत हिंदीचाही वापर व्हावा आणि हिंदीला राजभाषेचे स्थान मिळावे, या विचारातून राजभाषा धोरणाला चालना मिळाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.