Aaple Sarkar Phase 2 Pudhari
मुंबई

Aaple Sarkar Phase 2: सरकारी सेवांतील अनावश्यक टप्प्यांना लागणार कात्री

गुणवत्तापूर्ण शासकीय सेवांसाठी पुनरावलोकनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सरकारी प्रक्रियांमध्ये अनेक अनावश्यक टप्पे तयार झाले आहेत. त्यामध्ये सुधारणा करून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सोप्या आणि सुलभ करण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. नागरिकांना ‌‘आपले सरकार टप्पा 2‌’मधील नव्या बदलांचा अनुभव 15 ऑगस्ट 2026 रोजी देण्याचा संकल्प आहे. त्यानुसार सर्व विभागांनी बदलांना सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (गव्हर्न्मेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग - जीपीआर) प्रक्रिया राज्यात राबविण्यात येत आहे. त्याला गती देऊन शासकीय सेवा व योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 1 हजार 222 सेवांचे पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार केल्या आहेत. पुढील टप्प्यात अनेक सेवा एकत्रित होऊन हा आकडा आणखी कमी होईल, असेही ते म्हणाले.

प्रक्रियांच्या पुनर्रचनेमुळे प्रशासनाच्या कामात सुलभता येणार आहे. विभागप्रमुखांनी स्वतः लक्ष घालून कामाचे परीक्षण करावे. आवश्यक तेथे टप्पे कमी करावेत आणि प्रक्रियांना अधिक गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ‌‘आपले सरकार 2.0‌’मधील सर्व्हिस मॉड्युल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी ‌‘समग्र‌’च्या वतीने सादरीकरण करण्यात आले. पब्लिक ॲपचे जॉय बांदेकर यांनी शासकीय कामात वापरासंदर्भात माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT