मुंबई: आंदोलनाच्या आडून देशात अराजकता निर्माण करणे, हाच विरोधकांचा उद्देश आहे. केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हा सारा खेळ मांडण्यात आला असून त्यासाठी विद्यार्थी-शेतकर्यांना भडकवणे, भाषा आणि जातीच्या आधारे विद्वेष पसरविणे, देशातील प्रतिष्ठित संस्थांना बदनाम करण्याचे उद्योग सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 'रिजिम चेंज' संदर्भात प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याने विरोधकांचा सारा डाव उघडा पडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
एसआयआर प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी तसेच सीजेपीने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाच्या समर्थनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण यांनी 'आम्हाला देशात सत्ताबदल हवा आहे,' यात काही चुकीचे आहे का? सत्ता परिवर्तन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सरकारविरोधात असंतोष व्यक्त करणे हा गुन्हा नाही,' असे विधान केले होते.
दरम्यान, प्रशांत भूषण यांच्या या विधानाने विरोधकांचा डाव उघड झाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. 'यांच्या पोटातले शेवटी ओठावर आलेच, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टमधून केली आहे.